'Name Pune as Sambhajinagar'; The Republican Army will agitate soon | 'पुण्याचे नाव संभाजीनगर करा'; रिपब्लिकन सेना करणार आंदोलन

'पुण्याचे नाव संभाजीनगर करा'; रिपब्लिकन सेना करणार आंदोलन

ठळक मुद्दे शिवसेनेने त्याकाळात हिंदू- मुस्लिम अशी दरी निर्माण करण्यासाठी हे राजकारण केले पुणे हेच संभाजीनगर या नावासाठी योग्य ठिकाण आहे.

औरंगाबाद : औरंगाबादचे नव्हे तर पुण्याचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

त्यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यात संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करुन त्यांना ठार मारण्यात आले. त्यामुळे पुण्याची खूप मोठी बदनामी झाली आहे. ती धुवून काढण्यासाठी पुण्याचे नामकरण संभाजीनगर करण्याची गरज आहे. पुण्याचे नामकरण जिजापूर करा, अशी मागणी पुढे आली आहे, याकडे लक्ष वेधले असता आनंदराज म्हणाले, माॅं जिजाऊंबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. त्यांचे नाव शनिवारवाड्याला देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. 

औरंगाबादला संभाजीनगर हे नाव देण्याची मागणी १९८८ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती, हे निदर्शनास आणून देताच त्यांनी सांगितले की, संभाजीनगर हे नाव औरंगाबादला देण्याचे कारण नाही. शिवसेनेने त्याकाळात हिंदू- मुस्लिम अशी दरी निर्माण करण्यासाठी हे राजकारण केले व त्याचा त्यांना फायदाही झाला. पुणे हेच संभाजीनगर या नावासाठी योग्य ठिकाण आहे. पुण्याचे नाव संभाजीनगर करा, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेतर्फे लवकरच पुण्यात आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचेही आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केले.

....हा तर आंबेडकर द्रोह 
एका प्रश्नाच्या उत्तरात आंबेडकर यांनी रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे हे भरकटलेले आहेत, अशी टीका केली. आर्थिक व सामाजिक विषमतेला प्रोत्साहन देणाऱ्यांबरोबर जाणे हा आंबेडकरद्रोह होय, असे सांगत भालचंद्र मुणगेकर हे पीईएसचे अध्यक्ष बनणे म्हणजे चौथा गट तयार करणे होय. पीईएसच्या अध्यक्षपदी बौद्ध व्यक्ती असणे सक्तीचे आहे. रामदास आठवले व भालचंद्र मुणगेकर हे हिंदू महार आहेत. त्यामुळे त्यांना अध्यक्षच होता येत नाही, असा आक्षेप आनंदराज यांनी यावेळी घेतला. यावेळी संजीव बोधनकर, मिलिंद बनसोडे, आनंद कस्तुरे, सिध्दोधन मोरे, काकासाहेब गायकवाड, सुनील मनोरे, पंचशीला जाधव, मनिषा साळुंके आदी उपस्थित होते.

Web Title: 'Name Pune as Sambhajinagar'; The Republican Army will agitate soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.