‘यूपीएससी’त मराठवाडा चमकला; लातूर ५, नांदेड आणि बीडचे ३ तर हिंगोलीचा एकजण यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 01:25 PM2021-09-25T13:25:10+5:302021-09-25T13:28:16+5:30

UPSC Result : अवघ्या २१ व्या वर्षी नितिशा संजय जगताप या विद्यार्थिनीने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीच्या परीक्षेत उच्चांक केला आहे.

Marathwada shines in ‘UPSC’; 5 from Latur, 3 from Nanded and Beed and one from Hingoli | ‘यूपीएससी’त मराठवाडा चमकला; लातूर ५, नांदेड आणि बीडचे ३ तर हिंगोलीचा एकजण यशस्वी

‘यूपीएससी’त मराठवाडा चमकला; लातूर ५, नांदेड आणि बीडचे ३ तर हिंगोलीचा एकजण यशस्वी

googlenewsNext

औरंगाबाद : केंद्रीय लोकसेवा आयोगाने ( UPSC Result ) घेतलेल्या परीक्षेत मराठवाड्यातील ( Marathwada ) विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यात लातूर ५, बीड ३, हिंगोली १ आणि नांदेडच्या ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. लातूरचा विनायक महामुनी देशभरातून ९५, नितिशा जगताप १९९ वा आला आहे. ( Marathwada shines in ‘UPSC’; 5 from Latur, 3 from Nanded and Beed and one from Hingoli ) 

लातूरच्या शैक्षणिक वैभवशाली परंपरेत मानाचा तुरा
विनायक महामुनी ९५, नितिशा जगताप १९९, शुभम वैजनाथ स्वामी ५२३, पूजा अशोक कदम ५७७ आणि नीलेश गायकवाडने ६२९ रँक मिळवून लातूरच्या शैक्षणिक वैभवशाली परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे. नितिशा जगतापने तर पहिल्याच प्रयत्नात पदवी परीक्षा देऊन यूपीएससीचे शिखर गाठले आहे. तसेच नीलेश गायकवाडने दुसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा सर केली असून, विनायक महामुनीने चौथ्या प्रयत्नात देशात ९५ व्या रँकने येऊन लातूरच्या शैक्षणिक लौकिकात भर पाडली आहे. अवघ्या २१ व्या वर्षी नितिशा संजय जगताप या विद्यार्थिनीने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीच्या परीक्षेत उच्चांक केला आहे.
- पेट्रोकेमिकलमध्ये इंजिनिअर असलेल्या विनायक प्रकाश महामुनीने चौथ्या प्रयत्नात देशात ९५ वा रँक मिळवून लातूरचा लौकिक वाढविला आहे. नीलेश श्रीकांत गायकवाड यांनी दुसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा सर केली असून, गतवर्षी ते ७५२ व्या रँकने उत्तीर्ण झाले होते, तर यावर्षी त्यांनी ६२९ वा रँक मिळविला आहे.

नांदेड जिल्ह्यातील तिघांचे यश : एक शेतकरी, एक पत्रकार, तर एका पोलीस अधिकारी कुटुंबातील
रजत नागोराव कुंडगीर याने ६००, बाभूळगाव येथील शिवहार चक्रधर मोरे याने ६४९, तर नांदेडच्या सुमितकुमार दत्ताहरी धोेत्रे याने ६६० रँक मिळवित यश संपादन केले.
- नांदेड येथील पोलीस उपनिरीक्षक नागोराव कुंडगीर यांचे सुपुत्र रजत कुंडगीर याचे दहावीपर्यंतचे शिक्षण नांदेड येथे झाले. रजतची आई व भाऊ शुभम कुंडगीर हे लघु उद्योजक आहेत.
- बाभूळगावच्या शिवहार चक्रधर मोरे याने ६४९ रँक मिळविला. वडील चक्रधर मोरे हे शेतकरी असून, घरी पाच एकर जमीन आहे, तर बहीण राखी मोरे हिने एमबीबीएस पूर्ण केले आहे, भाऊ इंजिनिअर आहे. शिवहार याचे दहावीपर्यंतचे शिक्षण प्रतिभा निकेतन हायस्कूल, तर बारावीपर्यंतचे शिक्षण यशवंत महाविद्यालयात पार पडले.
- नांदेड येथील पत्रकार दत्ता हरी धोत्रे यांचे सुपुत्र इंजिनिअर सुमित धोत्रे याने युपीएससी ६६० रँक घेऊन यश मिळविले. आई प्राथमिक शिक्षिका आहे. सुमित धोत्रे यांचे शिक्षण आयआयटी, खडकपूर येथून पूर्ण झाले.

बीडच्या तिघांची भरारी
- बीडच्या शिरूर तालुक्यातील वारणी येथील शुभम नागरगोजे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. ४५३ वा क्रमांक त्याने पटकावला आहे. शुभमने औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई. (विद्युत) पदवी मिळवली आहे. शुभमचे वडील भाऊसाहेब बीडच्या जिल्हा परिषदेत शाखा अभियंता आहेत. तसेच आई उषा या सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता आहे. 
- अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील डॉ. किशोरकुमार अशोकराव देवरवाडे याने ७३५ वा क्रमांक पटकावला आहे. डाॅ. किशोरकुमारचे वडील राज्य परिवहन महामंडळात यांत्रिकी विभागात कर्मचारी आहेत.
- बीडचा यशवंत अभिमन्यू मुंडे याने देशात ५०२ वा क्रमांक पटकावला आहे. यशवंतचे प्राथमिक शिक्षण जगमित्र नागा विद्यालय परळी व माध्यमिक शिक्षण न्यू हायस्कूल, उच्च माध्यमिक शिक्षण शाहू कॉलेज लातूर येथे झाले आहे. जगमित्र नागा विद्यालयाचे सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक ए. पी. मुंडे यांचा तो मुलगा आहे.

हिंगोलीच्या वैभवचे यश
हिंगोली येथील वैभव सुभाषराव बांगर याने वयाच्या २१ व्या वर्षी व पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीच्या परीक्षेत ४४२ व्या रँकने यश मिळवून हिंगोलीकरांचा अभिमान बनला आहे. अवघ्या २५ दिवसांवर प्रीलियम परीक्षा असताना त्याने कोरोना वाॅर्डात उपचार घेत जिद्दीने अभ्यास करीत हे यश पदरी पाडून घेतल्याने कौतुकाचा विषय बनला आहे. हॉटेल व्यावसायिक सुभाष बांगर यांचा मुलगा आहे.

Web Title: Marathwada shines in ‘UPSC’; 5 from Latur, 3 from Nanded and Beed and one from Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.