Maharashtra Election 2019:In Marathwada, the name change in the list, confusion as there is no photo | Maharashtra Election 2019: मराठवाड्यात यादीतील नावात बदल, फोटो नसल्याने गोंधळ
Maharashtra Election 2019: मराठवाड्यात यादीतील नावात बदल, फोटो नसल्याने गोंधळ

औरंगाबाद : किरकोळ प्रकार वगळता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सोमवारी शांततेत मतदान पार पडले. काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड, पोलिंग चिट नसणे, यादीतील नावात बदल, फोटो नसल्याने गोंधळ उडाला.

औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ मतदारसंघ मिळून सरासरी ६५.४५ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. जिल्ह्यातील ९ मतदारसंघांत १२८ उमेदवार रिंगणात होते. मध्य मतदारसंघातील अपवाद वगळता कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. १०० हून अधिक ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात सोमवारी किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत झाले. जामखेड येथे भाजपा- राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांमध्ये वाद वगळता इतरत्र शांततेत मतदान झाले. जवळपास ७ बॅलेट युनिट, पाच कंट्रोल युनिट आणि जवळपास ५२ व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्या होत्या.

नांदेड जिल्ह्यात मतदानयंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये तांत्रिक अडचणी आल्याने लोहा येथे १३८ क्रमांकाच्या बुथवर सुमारे अर्धातास मतदान प्रक्रिया थांबली होती. मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव तांडा येथील मतदान केंद्रावर झालेल्या हाणामारीत वसंतवाडी येथील पाच जण जखमी झाले. देगलूर येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रामचंद्र भरांडे यांच्यावर काही जणांनी हल्ला केला. यामध्ये भरांडे हे जखमी झाले असून त्यांच्या वाहनाचेही नुकसान झाले आहे.

हिंगोलीत कळमनुरी तालुक्यात करवाडीकरांचा बहिष्कार कायम होता. लातूरला अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील देवकरा येथे पिकविम्यासाठी शेतकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता़ समजूत काढल्यावर त्यांनी मतदान केले.

परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीकाठी असलेल्या ८ गावांमधील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. या गावांमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकानेही मतदान केले नाही. जिल्ह्यात काही ठिकाणी यंत्रे बिघडली होती.

औरंगाबादला लाठीमार

औरंगाबादला मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि एमआयएमचे कार्यकर्ते कटकटगेट परिसरात समोरासमोर आले. याठिकाणी खा. इम्तियाज जलील गेले असता मोठी झटापट झाली. या झटापटीत खा. जलील यांचा शर्टही फाटला. पोलीस याठिकाणी वेळी पोहोचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार करुन त्यांना पांगविले.

बीड जिल्ह्यातील भीमनाईक तांडा येथील मतदारांना देवनदीतून चम्पूच्या सहाय्याने आणताना तहसीलदार सुरेखा स्वामी व कर्मचारी. खळवट लिमगाव येथे पावसामुळे पूल वाहून गेला होता. प्रशासनाकडून तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यात आल्याने जवळपास ६५ मतदारांना मतदान करता आले.

 


Web Title: Maharashtra Election 2019:In Marathwada, the name change in the list, confusion as there is no photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.