जीवघेणी धडपड थांबली अन् अखेर तो मुक्त झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 03:25 PM2020-07-03T15:25:44+5:302020-07-03T15:27:49+5:30

औरंगपुऱ्यातील दत्तमंदिरासमोर एका झाडावर नायलॉनचा मांजा लटकलेला होता. या मांजात २६ जून रोजी कावळा अडकला.

The life-threatening struggle stopped and he was finally released | जीवघेणी धडपड थांबली अन् अखेर तो मुक्त झाला

जीवघेणी धडपड थांबली अन् अखेर तो मुक्त झाला

googlenewsNext
ठळक मुद्देनायलॉनच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची दोन दिवसांपासून सुरू होती धडपड 

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : थोडासा विसावा मिळेल, म्हणून तो क्षणभर विस्तीर्ण झाडाच्या एका फांदीवर बसला. वाऱ्यामुळे झाडाच्या पानांचा सळसळ आवाज झाला आणि झाडावर लटकलेल्या मांजात तो नकळतपणे अडकत गेला. दोन दिवसांपासून त्याची सुटकेसाठी अयशस्वी धडपड सुरू होती. अखेर परिसरातील काही पक्षीप्रेमी त्याच्या मदतीला धावले आणि पुन्हा एकदा स्वच्छंदपणे विहार करण्यासाठी तो काकपक्षी मुक्त झाला.

औरंगपुऱ्यातील दत्तमंदिरासमोर एका झाडावर नायलॉनचा मांजा लटकलेला होता. या मांजात २६ जून रोजी कावळा अडकला. झाडाच्या अगदी समोरच योगेश मिसाळ यांचे घर आहे. झाडावर सारखे काहीतरी हलत असल्याने मिसाळ यांच्या मुलांचे व मित्रमंडळींचे तिकडे लक्ष गेले. कावळा मांजात अडकल्याचे  मुलांना दिसले. मुलांचा जीव कासावीस झाला; पण झाड खूप उंच असल्याने केवळ बघत बसण्याशिवाय त्यांच्या हातात काहीही नव्हते.

दुसऱ्या दिवशी पुन्हा मुलांनी पाहिले असता कावळा त्याच अवस्थेत दिसला. मांजाच्या गुंत्यातून सुटका करण्याची त्याची धडपड सुरूच होती. अस्वस्थ मुलांनी ही गोष्ट वडील योगेश मिसाळ यांना सांगितली. झाड उंच असल्याने पक्ष्याची सुटका करणे अवघड होते. मिसाळ यांनी सोशल मीडियावर ही माहिती आणि व्हिडिओ टाकला आणि पक्षीमित्रांकडे त्याच्या सुटकेसाठी आवाहन केले; परंतु काही प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर त्यांनी २८ रोजी अग्निशामक दलाशी संपर्क साधला. अग्निशामक दलाचे जवान तात्काळ आले व  त्यांनी कावळ्याची सुखरूप सुटका करून तो मिसाळ यांच्याकडे  दिला. कावळ्याची सुटका झाल्यामुळे बच्चेकंपनी आनंदून गेली.

दोन दिवस सुटका करून घेण्यासाठी धडपड करणाऱ्या कावळ्याच्या अंगावर मांजामुळे अनेक जखमा झाल्या होत्या. अनेक ठिकाणी त्याचे अंग कापले होते. त्यामुळे मिसाळ यांनी त्याला दवाखान्यात नेले आणि  त्याच्यावर उपचार केले. दोन दिवस त्याला घरामध्येच बास्केटमध्ये ठेवून त्याची काळजी घेतली आणि जखमा बऱ्या झाल्यानंतर ३० जून रोजी त्याला पुन्हा एकदा उंच भरारी घेण्यासाठी मुक्त करण्यात आले. एरवी कावळ्याला उपेक्षेची वागणूक मिळत असली तरी लॉकडाऊनच्या काळात घरी आलेला हा आगंतुक पाहुणा मात्र मिसाळ कुटुंबाचा आनंद द्विगुणित करणारा ठरला.

Web Title: The life-threatening struggle stopped and he was finally released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.