Leaders like Indira Gandhi fell in the election, says Bhaskar Pere Patil after the defeat of his daughter ... | इंदिरा गांधींसारखे नेते निवडणुकीत पडलेत, मुलीच्या पराभवानंतर भास्कर पेरे पाटील म्हणतात...

इंदिरा गांधींसारखे नेते निवडणुकीत पडलेत, मुलीच्या पराभवानंतर भास्कर पेरे पाटील म्हणतात...

ठळक मुद्देलोकांनी तुमच्या मुलीला का नाकारावं? या प्रश्नावर उत्तर देताना, माझ्या मुलीला का करावं?, असा प्रतिप्रश्न पेरे पाटील यांनी केला. गावातील लोकं सुशिक्षित अन् समजदार आहेत.

औरंगाबाद/मुंबई - राज्यात सगळीकडे ग्रामपंचायतीचा निकालांमध्ये अनेक प्रस्थापितांना धक्के पोहचले आहेत, यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. ग्रामपंचायत निकालात गावकऱ्यांनी काही ठिकाणी धक्कादायक कौल दिले आहेत, यातच पाटोदा ग्रामपंचायतीत लागलेला निकाल ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल, ज्या पाटोदा गावाचं नाव आदर्श ग्रामपंचायत आणि आदर्श सरपंच म्हणून देशभरात पोहचलं त्यांच्याच पॅनेलला गावकऱ्यांनी नाकारल्याचं चित्र आहे. मात्र, माझ्या मुलाचा पराभव माझ्यासाठी धक्कादायक निकाल नसल्याचं पेरे पाटील यांनी म्हटलंय. तसेच, या देशाने इंदिरा गांधीसारख्या नेत्यांचाही पराभव पाहिलाय, अशा शब्दात पेरे पाटील यांनी मुलीच्या पराभवाची समिक्षा केलीय. 

आपल्याकडं बुद्धीवंत आणि समजणारांची कमतरता आहे, माझ्या मुलीकडे एक मुलगी म्हणून पाहू नका. कारण, गावातून निवडूण आलेले सर्वजणच आपलेच आहेत. मी गेल्या 8 दिवसांपासून गावाबाहेर आहे, मी कर्नाटकात होतो. माझी सख्खी मुलगी असली तरी, अख्ख गाव माझंय, अशा शब्दात भास्कर पेरे पाटील यांनी आपल्या मुलीच्या पराभवाच्या समिक्षा केलीय. मुलीची इच्छा होती, म्हणून तीने निवडणूक लढवली. त्यात 10-12 मतांनी तिचा पराभव झाला, त्यात विशेष काही नाही. यातून खूप काही शिकायला मिळतं. माझाही एकदा पराभव झाला होता, इंदिरा गांधींसारखे नेते निवडणुकीत पडलेत, त्यात काही विशेष नाही. कारण, आपल्या देशात लोकशाही आहे.

लोकांनी तुमच्या मुलीला का नाकारावं? या प्रश्नावर उत्तर देताना, माझ्या मुलीला का करावं?, असा प्रतिप्रश्न पेरे पाटील यांनी केला. गावातील लोकं सुशिक्षित अन् समजदार आहेत. गावाला पुढे घेऊन जाणारे सर्व लोकं आहेत. त्यामुळे, गावचा विकास थांबणार नाही, गावच्या राजकारणात अनेक हेवेदावे असतात. पण, निवडून आलेल्या उमेदवार मुलीच्या गळ्यात माझ्या मुलीने हार घातला, यावरुन आपण सर्व लक्षात घेतला पाहिजे, असे पेरे पाटील यांनी सांगितलं. आता, मी मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे. त्यासाठी, मी स्वत: वेगळं कार्यालय सुरू केलं आहे, असेही पाटील यांनी म्हटलं.  

अनुराधा यांचा 25 मतांनी पराभव

पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदा खंडीत झाली, या निवडणुकीत आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या संपूर्ण पॅनेलला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भास्करराव पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पेरे यांनाही गावकऱ्यांनी नाकारलं आहे. अनुराधा पाटील यांना १८३ मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला २०८ मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला. पाटोदा ग्रामपंचायतील ८ सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत, तर उर्वरित ३ जागांसाठी मतदान घेण्यात आलं, त्यातील एका जागेवर अनुराधा पाटील उभ्या होत्या.

25 वर्षांपासून भास्कर पेरे पाटील सरपंच

गेल्या २५ वर्षापासून पाटोदा ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून भास्करराव पेरे पाटील काम करत होते, या काळात पेरे पाटलांनी गावचा जो विकास केला त्याचं कौतुक फक्त राज्यातच नव्हे तर देशभरात झालं, आदर्श गाव म्हणून पाटोद्याला ओळख मिळाली, यंदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला, गावच्या तरूण पिढीला पुढे आणण्यासाठी मी माघार घेतली आहे. मुलीने निवडणुकीत अर्ज केला आहे, परंतु तिला स्वीकारावं की नाकारावं हा सर्वस्वी निर्णय गावकऱ्यांचा असल्याचं भास्करराव पेरे पाटील म्हणाले होते.
 

Web Title: Leaders like Indira Gandhi fell in the election, says Bhaskar Pere Patil after the defeat of his daughter ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.