अखेरचा लाल सलाम ! स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांचे निधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 02:27 PM2021-11-30T14:27:22+5:302021-11-30T14:32:36+5:30

कष्टकरी, गरीबांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक लढे लढले. वकील म्हणून सुद्धा त्यांनी उपेक्षितांना अनेक प्रकरणात न्याय दिला.

lal Salam ! Freedom Fighter Comrade Manohar Taksal passes away | अखेरचा लाल सलाम ! स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांचे निधन 

अखेरचा लाल सलाम ! स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांचे निधन 

Next

औरंगाबाद : जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांचे आज दुपारी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. मराठवाडा मुक्तीसंग्राम लढा, विद्यापीठ नामांतर आंदोलनात त्यांनी अग्रणी राहून कार्य केले होते. तसेच अखेरपर्यंत ते भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक, दलित अत्याचार विरोधी संघर्ष समितीमध्ये सक्रीय होते. त्यांचा पार्थिव देह खोकडपुरा येथील भाकप कार्यालय येथे अखरेच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. बुधवारी ( दि. 1 डिसेंबर 2021 ) रोजी सकाळी 10 वाजता कैलासनगर स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

पेशाने वकील असलेले कॉ. मनोहर टाकसाळ हे मूळ बीड जिल्ह्यातील होते. त्यांचे मूळ गाव नवगण राजुरी. येथेच पिराजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याच्या लढ्यात ते ओढले गेले. याच दरम्यान त्यांच्यावर साम्यवादाचे संस्कार झाले. तेव्हापासून त्यांनी हाती धरलेला लालबावटा सोडला नाही. कष्टकरी, गरीबांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक लढे लढले. वकील म्हणून सुद्धा त्यांनी उपेक्षितांना अनेक प्रकरणात न्याय दिला. त्यांच्या निधनाने कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.  त्यांच्या पश्चात पत्नी लिलाबाई, विवाहित मुलगी क्रांती, मुलगा अजय आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कामात सक्रिय असलेला भाकपचा जिल्हा सहसचिव कॉ. अभय, स्नुषा विद्या व मानसी असा परिवार आहे. 

कष्टकऱ्यांच्या सेवेसाठी सोडली शिक्षकाची नोकरी
मूळचे बीडचे नवगण राजुरीचे असलेले मनोहर टाकसाळ हे अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे आले. बीड येथे कॉम्रेड काशिनाथराव जाधव यांनी सुरू केलेल्या जनता वसतिगृहात त्यांना शिक्षणाची व जेवण्याची राहण्याची व्यवस्था झाली. औरंगाबादेत शिवाजी हायस्कूलला काही काळ शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. परंतु, पक्षाचे काम करण्यास जास्त वेळ मिळावा व कुठलेही बंधन असू नये म्हणून त्यांनी वकिलीचा अभ्यासक्रम पूर्ण करून वकिली व्यवसाय सुरु केला. कामगार कष्टकऱ्यांची अनेक प्रकरणे त्यांनी कायद्याच्या मार्गाने लढवली व न्याय मिळवून दिला. 

अन्याय, अत्याचाराविरोधात कायम आघाडीवर 
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 1952 पासून ते  सभासद होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ते राष्ट्रीय कौन्सिल सदस्यपर्यंत त्यांचा प्रवास राहिला. राज्य सहसचिव, राज्य सचिव व  मंडळाचे अनेक वर्षे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनचे महाराष्ट्र राज्याचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. औरंगाबाद येथील दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी स्थापनेपासून तर शेवटपर्यंत काम पाहिले. या समितीचे सचिव बुद्ध प्रिय कबीर होते. भारतीय खेत मजदूर युनियन बीकेएमएमयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे ते काही काळ सदस्य होते. गोवा मुक्तिसंग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यात ते अग्रणी होते. तसेच मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. या प्रश्नांवर अनेक कार्यकर्त्यांसोबत ते तुरुंगात होते. गंगापुर विधानसभेची निवडणूक दोन वेळेस, तर औरंगाबाद मध्य विधानसभे मधूनही त्यांनी एक वेळेस निवडणूक लढवली होती. कामगार शेतमजूर रोजगार हमी मजूर कष्टकरी या समूहांचे लढे त्यांनी जिद्दीने व आक्रमकपणे लढवले. अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने औरंगाबाद येथे उच्च न्यायालयाच्या आवारात मोर्चा काढल्यामुळे त्यांना 2007 ला पुन्हा तुरुंगात राहावे लागले होते. औरंगाबाद येथील दलित अत्याचार विरोधी संघर्ष समितीच्या समितीचे अध्यक्ष या नात्याने समितीच्या सदस्यांना पदाधिकाऱ्यांना त्यांचे कायम मार्गदर्शन लाभत असे.

Web Title: lal Salam ! Freedom Fighter Comrade Manohar Taksal passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app