अस्थींच्या रूपाने महामानव बाबासाहेब औरंगाबादेतच

By शांतीलाल गायकवाड | Published: December 6, 2019 11:32 AM2019-12-06T11:32:15+5:302019-12-06T11:36:08+5:30

महापरिनिर्वाण दिन : बी.एस. मोरे यांच्या निवासस्थानी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील पुतळा व मावसाळा येथील बुद्धविहारात बाबासाहेबांच्या अस्थींचे कलश

In the form of Asthi, Lord Dr. Babasaheb Ambedkar is still alive in Aurangabad | अस्थींच्या रूपाने महामानव बाबासाहेब औरंगाबादेतच

अस्थींच्या रूपाने महामानव बाबासाहेब औरंगाबादेतच

googlenewsNext
ठळक मुद्दे जीवन जगण्याची प्रेरणा देणाऱ्या चिरंतन स्मृती शहरात तीन ठिकाणीस्वातंत्र्यसेनानी बी.एस. उपाख्य भाऊसाहेब मोरे यांच्या प्रयत्नातून अस्थी औरंगाबादेत

- शांतीलाल गायकवाड 

औरंगाबाद
‘सात कोटींचा प्रकाश गेला
झाली जीवाची लाही
भीमापाठी जगात आता
वाली उरला नाही...’  

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अशी अश्रुफुले पदोपदी वाहिली जात असली तरी, या महामानवाचा विचार, त्यांच्या आठवणी, त्यांनी वापरलेल्या व हाताळलेल्या वस्तू आता अनेकांच्या प्रेरणा झाल्या आहेत; बाबांच्या अस्थीही आता अमूल्य ठेवा आहेत. नागसेनवनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारताना पायाभरणीत बाबांच्या अस्थी टाकण्यात आल्या. मावसाळा येथील विश्वशांती बुद्धविहारातही या अस्थी कायमस्वरूपी ठेवण्यात आल्या आहेत. या अस्थींच्या रुपात बाबासाहेब औरंगाबादेतच आहेत. हा ठेवा मराठवाड्यात सर्वप्रथम आला तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ मराठवाड्यातील घराघरात पोहोचविणारे स्वातंत्र्यसेनानी बी.एस. उपाख्य भाऊसाहेब मोरे यांच्यामुळे. 

अशा या स्मृती...
दि. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीत बाबासाहेबांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव दि.७ डिसेंबरला मुंबईला राजगृहात आणण्यात आले. दादर चौपाटीवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. स्टेट शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दि.९ डिसेंबर रोजी शोकसभा झाली. तीत डॉ. बाबासाहेबांच्या विचारांना एकनिष्ठ राहण्याची शपथ घेण्यात आली. याच बैठकीत फेडरेशनचे अध्यक्षीय मंडळ नेमले गेले. बाबासाहेबांच्या अस्थी फेडरेशनच्या सर्व विभागीय अध्यक्षांना देण्यात आल्या. भाऊसाहेब मोरे फेडरेशनच्या मराठवाडा शाखेचे अध्यक्ष बी.एस. मोरे यांनी हा अस्थी कलश उभी हयात जिवापाड जपला. तो कलश घेऊन त्यांनी मराठवाड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार केला. हा कलश त्यांनी त्यांचे सुपुत्र प्रवीण यांच्याकडे सुपूर्द केला. प्रवीण मोरे हे पोलीस दलात निरीक्षक असून, सध्या परभणी येथे कार्यरत आहेत. 

मावसाळा येथे अस्थीदर्शन 
अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रचार मंत्री प्रा. भदन्त सुमेधबोधी महास्थवीर यांनी मावसाळा ‘बुद्धभूमी’ येथील विश्वशांती बुद्धविहारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘अस्थी कलश’ २०१४ साली कायमस्वरूपी दान दिला. तेव्हापासून दरवर्षी दि.६ डिसेंबर रोजी हा अस्थी कलश अभिवादनासाठी खुला केला जातो, अशी माहिती भदन्त एस. प्रज्ञाबोधी महाथेरो यांनी दिली. या वर्षीही सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा अस्थी कलश उपासक-उपासिकांना अभिवादनासाठी उपलब्ध राहणार आहे. 

यंदा परभणीत अस्थीदर्शन
या अस्थींचे सर्वांना दर्शन व्हावे यासाठी आम्ही भीमजयंती व स्मृतिदिनी या पवित्र अस्थी सर्वांसाठी खुल्या करतो. यंदा परभणी येथे शुक्रवारी दिवसभर या पवित्र अस्थी सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील. यापुढे या अस्थी कायमस्वरूपी ठेवण्यासाठी एक ज्ञान मंदिर उभारण्याची आमची कल्पना आहे. आमच्या वडिलांचीही हीच ईच्छा  होती. 
-प्रवीण मोरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, परभणी.

Web Title: In the form of Asthi, Lord Dr. Babasaheb Ambedkar is still alive in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.