'Food Safari' and 'Heritage' apps will change the city's identity; The concept presented by the Aurangabad Municipal Commissioner | 'फूड सफारी' आणि 'हेरीटेज' अ‍ॅप शहराची ओळख बदलतील; महापालिका आयुक्तांनी मांडली संकल्पना
'फूड सफारी' आणि 'हेरीटेज' अ‍ॅप शहराची ओळख बदलतील; महापालिका आयुक्तांनी मांडली संकल्पना

ठळक मुद्देखाद्यप्रेमापोटी आयुक्तांची ‘नान’रोटी ‘फूड कल्चर’ची विचारपूस पॅरिसप्रमाणे शहरातील दरवाजांची ओळख व्हावी 

औरंगाबाद : रोशनगेटमध्ये नान बनविणाऱ्या एका कारागिराकडून ते कसे बनवितात याची माहिती महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांण्डेय यांनी घेऊन खाद्यप्रेमी असल्याचेही दाखवून दिले आहे. तसेच ऐतिहासिक दरवाजांसाठी हेरिटेज सफारी सुरू करण्यास रस्त्यापासून दहा फूट लांबपर्यंत मालमत्ता असाव्यात, यासाठी प्रयत्न करण्याबाबतच्या सूचना आयुक्तांनी केल्या. यासोबतच शहराची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी खाद्य संस्कृतीसाठी 'फूड सफारी' आणि पर्यटनासाठी 'हेरीटेज' अ‍ॅप सुरु करण्याची संकल्पना आयुक्तांनी मांडली.

रोशनगेट, कटकटगेट परिसरात पाहणी करताना ‘नान’रोटी करणारा कारागीर आयुक्तांच्या निदर्शनास आला. त्यांनी तेथे जाऊन कारागिराला हे काय आहे? असा प्रश्न अचंबित होऊन केला. त्या कारागिरालादेखील काही समजले नाही. नंतर अधिकाऱ्यांनी, ‘साहेब, ही नान रोटी आहे’, असे उत्तर दिले. त्यावर आयुक्त म्हणाले, ‘ओके तो नान-खलिया जिसे कहते  है ये वही है.’ उपस्थित नगरसेवक म्हणाले, ‘सर, ये बस नान है, खलिया अलग होता है.’ त्यावर आयुक्तांनी नान रोटी भट्टीत कशी भाजली जाते, हे पाहिल्यावर कारागिराचे कौतुक केले. शहरातील खाद्यसंस्कृतीची माहिती देण्यासाठी फूड सफारी अ‍ॅप तयार करून त्यात येथील खास पारंपरिक पदार्थ, हॉटेलची माहिती पर्यटकांसाठी ठेवण्याची संकल्पना आयुक्तांची सुचविली. यातून शहराला वेगळी ओळख निर्माण होऊ शकेल, असे ते म्हणाले.

पॅरिसप्रमाणे शहरातील दरवाजांची ओळख व्हावी 
शहरात ५२ ऐतिहासिक दरवाजे आहेत. पॅरिसमध्ये जसे अ‍ॅलेक्झांडर गेट आहे. तशी ओळख येथील दरवाजांची व्हावी, यासाठी दीड वर्षाचा एक नियोजन आराखडा करा. एका मोबाईल अ‍ॅपमध्ये सर्व दरवाजांची माहिती संकलित करा. त्यात इतर ऐतिहासिक वास्तूंचाही समावेश करा. पर्यटकांना ऑनलाईन माहिती मिळण्याचे हे साधन होईल. नियोजन, अंदाजपत्रक, आराखडा अंमलबजावणी, असा दीड वर्षाचा हा प्लॅन करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. 
 

Web Title: 'Food Safari' and 'Heritage' apps will change the city's identity; The concept presented by the Aurangabad Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.