वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील ध्रुवतारा बायाटेक प्रा. लि. या कंपनीला बुधवारी (दि.३ ) पहाटे ३ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. कंपनीची संपूर्ण तीन मजली इमारत आगीच्या घेऱ्यात येऊन जवळपास ५ कोटींचे नुकसान झाले आहे. आगीत तयार स्पेअर पार्टस व रॉ-मटेरियल्स जवळून भस्मसात झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून  नाईटशिफ्टमधील सर्व २५ कामगार सुरक्षित आहेत.चार

अशोक बलभीम थोरात (रा. श्रेयनगर, औरंगाबाद) यांच्या दर्शन ग्रुपची वाळूज एमआयडीसीतील (प्लॉट क्रमांक डब्ल्यु ९७) येथे ध्रुवतारा बायोटेक प्रा. लि. या नावाची कंपनी आहे. या कंपनीत दुचाकी व तीनचाकी वाहनासाठी लागणारे विविध प्रकारच्या प्लॉस्टिक साहित्याचे उत्पादन करुन नामांकित कंपन्याला पुरविण्यात येते. बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास या कंपनीत अचानक आग लागली. नाईटशिफ्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी वाळूज अग्नीशमन व एमआयडीसी वाळूज पोलिसांना माहिती देऊन आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र कंपनीतील प्लॉस्टिकचे तयार पार्टस व रॉ-मटेरियलने यांनी लागलीच पेट घेतल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. कंपनीतून उठणारे धुराचे लोळ व आगीच्या ज्वालामुळे लगतच्या कंपनीतील कामगार, उद्योजक यांनीही घटनास्थळ गाठून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. प्रथमदर्शनी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज कंपनी मालक अशोक थोरात यांनी वर्तविला आहे. आगीमुळे जवळपास ५ कोटी रुपयांची हानी झाल्याचे उद्योजक थोरात यांनी सांगितले.

बंबाच्या सहाय्याने ५ तासानंतर आगीवर नियंत्रण
सुरवातीला गरवारे कंपनीच्या अग्नीशमन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आग आोटक्यात येत नसल्याने यानंतर वाळूज, बजाज व मनपा अग्नीशमन दलाने एकत्रित प्रयत्न सुरु केले. यासोबतच आग विझविण्यासाठी जवळपास ३० खाजगी टँकर सुद्धा कमी आले. सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास आग विझविण्यात अग्नीशमन दलाला यश आले.

कामगारांना अश्रू अनावर 
नाईटशिफ्टमध्ये २५ कामगार कंपनीत कामासाठी आले होते. आग लागल्यानंतर कामगारांनी आग विझविण्यास मदत केली. मात्र, आगीने रौद्ररुप धारण केल्यानंतर ते वेळीच बाहेर पडले. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, डोळ्यादेखत कंपनी जळत आहे आणि आपण हतबल आहोत या भावनेने कामगारांना अश्रू अनावर झाले होते.

Web Title: A fire broke out at a company manufacturing spare parts in the Waluj industrial area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.