तब्बल १२ हजार बोगस शिधापत्रिकांचे वितरण; तहसील कार्यालयातील दोन लिपिकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 07:22 PM2020-10-20T19:22:10+5:302020-10-20T19:25:26+5:30

१५ हजार शिधापत्रिके पैकी जवळपास १२ हजार शिधापत्रिकांची पैठण तहसील कार्यालयात नोंदच नसल्याचा गंभीर प्रकार त्रीसदस्यीय समितीने केलेल्या चौकशीतून समोर आला होता.

Distribution of 12,000 bogus ration cards; Two clerks of Paithan Tehsil office arrested | तब्बल १२ हजार बोगस शिधापत्रिकांचे वितरण; तहसील कार्यालयातील दोन लिपिकांना अटक

तब्बल १२ हजार बोगस शिधापत्रिकांचे वितरण; तहसील कार्यालयातील दोन लिपिकांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देतपास आयपीएस अधिकाऱ्याकडेगाव निहाय समितीची स्थापना

पैठण : पैठण तहसील कार्यालयातील  बहूचर्चीत बोगस शिधापत्रिका  वितरण प्रकरणात  पैठण पोलिसांनी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या तत्कालीन दोन  लिपिकांना अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी संबंधिता विरोधात ऑगस्ट २०१९ मध्ये पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जवळपास १२ हजार बोगस शिधा पत्रिका तहसील कार्यालयात  कुठलीही नोंद न करता परस्पर वितरीत करण्यात आल्याचे हे प्रकरण आहे. यात महसूलच्या काही बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याने याचा तपास आयपीएस अधिकारी गोरख भामरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तपासात तहसील कार्यालयातील नोंदी पेक्षा जास्त शिधापत्रिका आढळून आल्या असून या शिधापत्रिका कुणी व कशा वितरीत केल्या आहेत या बाबत पोलीस तपास प्रगतीपथावर असल्याचे उपविभागीय अधिकारी गोरख भामरे यांनी सांगितले. या प्रकरणात गुंतलेल्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल असेही भामरे यांनी सांगितले.

या प्रकरणातील पुरवठा विभागातील तत्कालीन लिपिक अब्दुल गफ्फार गाझी, व आर एस जाधव यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. दोघेही सध्या गंगापूर तहसील कार्यालयात कार्यरत आहेत. अन्य आरोपी असलेले नायब तहसीलदार नामदेव देशटवाड यांचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलेला आहे. या प्रकरणात तत्कालीन दोन तहसीलदार यांच्यावरही चौकशी समितीने ठपका ठेवला असून त्यांचा या प्रकरणात सहभाग आहे का या बाबत पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणात कसून चौकशी करण्यात येत असून कुणाचीही गय केली जाणार नाही असे उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण : पैठण तहसील कार्यालयातून गायब असलेल्या शिधापत्रिका प्रकरणात २५ ऑगस्ट, २०१९ रोजी, १५ हजार शिधापत्रिका विक्रीचे शुल्क शासन दरबारी जमा न करता अपहार केल्याचा  गुन्हा तत्कालीन पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार नामदेव देशटवाड यांच्या सह दोन लिपिकावर पैठण पोलीस ठाण्यात  दाखल करण्यात आला होता. जानेवारी २०१५ ते ऑगस्ट २०१५ दरम्यान पैठण तहसील कार्यालयातून वितरित करण्यात आलेल्या १५००० शिधापत्रिकाचे शुल्क ७९०६१ रूपये तत्कालीन पुरवठा नायब तहसीलदार नामदेव देशटवाट, पुरवठा लिपिक अब्दुल गफ्फार गाझी, व आर एस जाधव यांनी जमा न करता अपहार केल्याची फिर्याद नायब तहसीलदार कमल मनोरे यांनी दिली होती या फिर्यादीवरून पोलिसांनी तीघावर गुन्हा दाखल केला होता.

तब्बल १२ हजार शिधापत्रिकांची नोंद नाही
पैठण तालुक्यातील नागरिकांना वितरित करण्यासाठी  दिलेल्या १५ हजार शिधापत्रिके पैकी जवळपास १२ हजार शिधापत्रिकांची पैठण तहसील कार्यालयात नोंदच नसल्याचा गंभीर प्रकार त्रीसदस्यीय समितीने केलेल्या चौकशीतून समोर आला होता. विशेष म्हणजे गायब झालेल्या  शिधापत्रिका द्वारे स्वस्त धान्य दुकानातून धान्य उचलण्यात येत  असल्याचेही समोर आले होते. या प्रकाराने शासकीय धान्य काळ्याबाजारात जात असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, शासकीय समितीने या गंभीर प्रकरणात ठपका ठेवलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर  कुठलीच कारवाई न झाल्याने  आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. बोगस शिधापत्रिका शोधुन काढण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या तहसीलदार यांनी गावनिहाय समिती गठीत केली आहे. 

एकाच कुटुंबात दोन शिधापत्रिका 
पैठण तालुक्यात एकाच कुटुंबाच्या नावाने दोन दोन शिधापत्रिका वेगवेगळ्या क्रमांकाने वितरित करण्यात आल्या आहेत. वितरित झालेल्या शिधापत्रिका पैकी एकच शिधापत्रिका संबंधित कुटुंबाकडे असून त्याच्या नावाची दुसरी शिधा पत्रिका कुणाकडे आहे याची माहिती सुध्दा त्याच्या कडे नाही. तालुक्यातील ईंदेगाव येथील कल्याण नवथर यांनी त्यांच्या गावातील एकाच कुटुंबातील दोन शिधापत्रिका व त्या आधारे धान्याची केलेली उचल या बाबत तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात पुराव्यासह अर्ज दाखल केला होता.

Web Title: Distribution of 12,000 bogus ration cards; Two clerks of Paithan Tehsil office arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.