शहराला डेंग्यूचा 'महाविळखा'; आणखी दोघांच्या मृत्यूने मृतांची संख्या ९ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 04:40 PM2019-11-13T16:40:09+5:302019-11-13T16:44:04+5:30

औरंगाबाद शहरात दीड महिन्यात मृतांची संख्या ९ वर 

Dengue's death toll increased in Aurangabad city; The death toll rises to Nine, with two more deaths | शहराला डेंग्यूचा 'महाविळखा'; आणखी दोघांच्या मृत्यूने मृतांची संख्या ९ वर

शहराला डेंग्यूचा 'महाविळखा'; आणखी दोघांच्या मृत्यूने मृतांची संख्या ९ वर

googlenewsNext
ठळक मुद्देनारेगावातील ७ वर्षीय बालकगणेश कॉलनीतील २७ वर्षीय युवकाचा मृत्यू

औरंगाबाद : शहरात डेंग्यूचा ‘महाविळखा’ कायम असून, मंगळवारी घाटी रुग्णालयात ७ वर्षीय बालकाचा आणि खाजगी रुग्णालयात २७ वर्षीय युवकाचा उपचार सुरू असताना डेंग्यूनेमृत्यू झाला. कामरान शरीफ शेख (७, रा. नारेगाव) आणि शेख सैफुल्लाह सलिमुल्लाह (२७, रा. गणेश कॉलनी, रशीदपुरा) अशी मृत्यू पावलेल्या रुग्णांची नावे आहेत.

कामरान शरीफ शेख याला १० नोव्हेंबर रोजी उपचारासाठी घाटीतील बालरोग विभागाच्या वॉर्ड क्रमांक-२५ मध्ये दाखल केले होते. त्याच्या प्लेटलेट २२ हजारांपर्यंत खाली आल्या होत्या. डेंग्यूचा एनएस-१ तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला होता. उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकाºयांनी दिली. त्याच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यामुळे काही वेळेसाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. उपचाराकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष झाले नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

दुसरीकडे शेख सैफुल्लाह सलिमुल्लाह याला ११ नोव्हेंबर रोजी रात्री एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एमजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. आर. राघवन म्हणाले, सदर रुग्णावर आधी दोन खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा रुग्णाची प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान डेंग्यू शॉक सिंड्रोमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. घाटीतील बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे म्हणाल्या, सदर बालक डेंग्यू पॉझिटिव्ह होता. प्लेटलेट कमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या दोन्ही रुग्णांविषयी माहिती घेतली जाईल, असे मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. डेंग्यूच्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्लेटलेटसाठी भटकंती करावी लागत आहे. या दोन्ही रुग्णांच्या प्लेटलेट कमी झाल्या होत्या. प्लेटलेटचा तुटवडा दूर होण्यासाठी रक्तदात्यांनी पुढे येण्यासह प्लेटलेट तयार होण्यासाठी रक्तपेढ्यांनी प्राधान्य  देणे आवश्यक आहे. 

लोकप्रतिनिधींचा दबाव नसल्याने यंत्रणा सुस्त
 नोव्हेंबर महिन्यातही डेंग्यूचा उद्रेक वाढत असताना, महापालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाला गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. सध्या लोकप्रतिनिधी सरकार स्थापन आणि राजकीय उलथापालथीत मग्न झालेले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कोणाचीही नजर नाही. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी शासकीय अधिकाºयांना धारेवर धरणारे लोकप्रनिधी सध्या गायब आहेत. त्यामुळे यंत्रणा सुस्त झाली आहे. परिणामी, आणखी किती जणांचा बळी डेंग्यू घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. 

बळींची संख्या यापेक्षा अधिक ?
शहरात सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर या कालावधीत डेंग्यूने ७ जणांचा बळी गेला होता. या दोन मृत्यूमुळे डेंग्यूने मृत्यू पावणाºयाची संख्या ९ वर गेली आहे. गेल्या महिनाभरात काही संशयित रुग्णांचाही मृत्यू झाला; परंतु हे रुग्ण डेंग्यूचे नसून इतर आजारांचेच असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून केला जात आहे. खाजगी रुग्णालयात मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, ही आक डेवारी समोर येऊ दिली जात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे डेंग्यूने बळी गेलेल्या रुग्णांची संख्या ९ पेक्षा अधिक असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

बालकांवर उपचार सुरू
तापासह डेंग्यू संशयित रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. घाटीत डेंग्यू आणि डेंग्यू संशयित रुग्णांनी वॉर्ड भरलेले आहे. बालरोग विभागात ३ संशयित रुग्ण मुलांवर उपचार सुरू आहे. खाजगी रुग्णालयांत तर उपचार घेणाºयांची रुग्णसंख्या कितीतरी अधिक आहे.

Web Title: Dengue's death toll increased in Aurangabad city; The death toll rises to Nine, with two more deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.