७०० ज्येष्ठांसमोर ‘अंधार’; मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 07:55 PM2020-07-09T19:55:58+5:302020-07-09T20:04:29+5:30

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया बंद पडल्या.

'Darkness' in front of 700 elders; Cataract surgery stopped | ७०० ज्येष्ठांसमोर ‘अंधार’; मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया ठप्प

७०० ज्येष्ठांसमोर ‘अंधार’; मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देचार महिन्यांपासून मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया ठप्पजिल्हा नेत्र विभागात महिन्याला सुमारे २५० ते ३०० रुग्णांच्या शस्त्रक्रिया होतात. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागांतील रुग्णांना बसत आहे.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : जिल्ह्यातील सुमारे ७०० ज्येष्ठांसमोर ‘अंधार’ दाटला आहे. कारण गेल्या चार महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयाच्या आमखास मैदानासमोरील नेत्र विभागात मोतीबिंदू शस्त्रक्रिया ठप्प आहेत. घाटीतही ही शस्त्रक्रिया बंद आहे. त्यामुळे अंधारात चाचपडण्याची वेळ वृद्धांवर येत आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत आमखास मैदानासमोर नेत्र विभाग आहे. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया याठिकाणी होत असतात. त्याचबरोबर काचबिंदूच्याही याठिकाणी शस्त्रक्रिया होतात. खासगी रुग्णालयांमध्ये  मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांसाठी ५ हजारांपासून तर एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम मोजावी लागते. मात्र, राष्ट्रीय योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत केली जाते. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील गरीब व मध्यमवर्गातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ घेतात. 

जिल्हा नेत्र विभागात महिन्याला सुमारे २५० ते ३०० रुग्णांच्या शस्त्रक्रिया होतात. मात्र, जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया बंद पडल्या. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागांतील रुग्णांना बसत आहे. मोतीबिंदू ५० वर्षांवरील व्यक्तीत आढळून येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रुग्णाला अंधुक दिसते. मोतीबिंदू अधिक दिवस तसाच राहिला, तर त्याचे रूपांतर काचबिंदूत होते. त्यातून अधिक त्रास सहन करण्याची वेळ येते. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानंतरच ही शस्त्रक्रिया पुन्हा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

रुग्ण कमी झाल्यावर शस्त्रक्रिया
कोरोनामुळे मार्चपासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया बंद आहे. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांची नोंदणी केली जात आहे. ही संख्या जवळपास ७०० आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली की, शस्त्रक्रिया सुरू होतील.
-डॉ. सुनीता गोल्हाईत, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक 


केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रिया
मेडिसिन विभागात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे मेडिसिन विभागासाठी नेत्र विभागाचा वॉर्ड देण्यात आला आहे. त्यामुळे नियमित मोतीबिंदू शस्त्रक्रिया सध्या बंद आहे. केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रिया होत आहेत.
-डॉ. वर्षा नांदेडकर, नेत्र विभागप्रमुख, घाटी 
 

Web Title: 'Darkness' in front of 700 elders; Cataract surgery stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.