A boiler explosion at a company that processes old tires; Three injured | जुन्या टायरवर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीत बॉयलरचा स्फोट; तीन जखमी 

जुन्या टायरवर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीत बॉयलरचा स्फोट; तीन जखमी 

ठळक मुद्देकंपनीत परराज्यातील ८ कामगार कामालास्फोटामुळे कंपनीत छतावरील सिमेंटची पत्रे निखळून खाली पडली.

दौलताबाद : मुंबई- नाशिक महामार्गावर फतियाबादजवळ असलेल्या स्वस्तिक पायरो इंडस्ट्री या कंपनीतील बॉयलरचा स्फोट होऊन शुक्रवारी तीन कामगार जखमी झाले आहेत. सुरेश श्रीचंदवाल (२५), कुलदीप सेनी (२३, दोघेही रा. डाकी इमेलिया, जि. महुवा, उत्तर प्रदेश) व रामू भोली गवारी (२२, रा. बांदा, ता. करवी, जि. चित्रकूट, उत्तर प्रदेश) अशी जखमी कामगारांची नावे आहेत.

जुन्या टायरवर प्रक्रिया करण्याचे काम स्वस्तिक पायरो इंडस्ट्रीमध्ये करण्यात येते. शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास कामगार बॉयलरचा दरवाजा उघडत असताना आत निर्माण झालेल्या गॅसमुळे मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता भयंकर स्वरुपाची असल्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला होता. तसेच या स्फोटामुळे कंपनीत छतावरील सिमेंटची पत्रे निखळून खाली पडली. या अपघातात सुरेश श्रीचंदवाल, कुलदीप सेनी व रामू भोली गवारी हे कामगार  जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना तात्काळ उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दौलताबाद पोलीस ठाण्याचे पोउनि. रवी कदम व त्यांचे सहकारी नितीन साबळे आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 

८ कामगार कामाला
स्वस्तिक कंपनीत जुने टायर बॉयलरमध्ये टाकून बारा तास त्याला गरम करण्यात येते. त्यानंतर त्याला थंड करण्यासाठी सोडण्यात येेते. यावेळात सदर टायरमधील ऑइल एका बॉयलरमध्ये जमा होते. २६ तासांनंतर या बॉयलरचे झाकन उघडून त्यातील तार व टायरची राख काढण्यात येते. हे काम करण्यासाठी कंपनीत आठ मजूर आहेत. हे सर्व मजूर परराज्यातील आहेत.
 

Web Title: A boiler explosion at a company that processes old tires; Three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.