भाजपने पाठीत खुपसला खंजीर Vs हिंदू मतांचा सेनेकडून अपमान 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 01:54 PM2019-11-09T13:54:27+5:302019-11-09T14:21:18+5:30

काडीमोडचे पडसाद शिवसेना आणि भाजपच्या गोटात उमटले आहेत.

BJP break faith Vs insulting Hindu votes by Sena | भाजपने पाठीत खुपसला खंजीर Vs हिंदू मतांचा सेनेकडून अपमान 

भाजपने पाठीत खुपसला खंजीर Vs हिंदू मतांचा सेनेकडून अपमान 

googlenewsNext

औरंगाबाद : राज्य सरकार स्थापन करण्यावरून शिवसेना-भाजप महायुतीचा शुक्रवारी काडीमोड झाला. दोन्ही पक्षांच्या वतीने पत्रकार परिषदा घेऊन एकमेकांवर खोटारडे बोलत असल्याचे आरोप करण्यात आले. मात्र याचे पडसाद शिवसेना आणि भाजपच्या गोटात उमटले आहेत. भाजपने विश्वासघात करून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. बोलायचे एक आणि करायचे दुसरे अशा प्रकारे भाजपची भूमिका असल्याचा आरोप शिवसेनेने केला, तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेने महायुतीचा आणि हिंदुत्वावर प्रेम असलेल्या मतदारांचा अपमान केल्याची टीका केली आहे. 

भाजपने पाठीत खुपसला खंजीर, ठरल्याप्रमाणे भाजप वागला नाही
भाजप आणि शिवसेनेत जे ठरले होते, त्याप्रमाणे भाजप वागलाा नाही. युती करण्यापूर्वी पक्षप्रमुख ठाकरे हे राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांशी बोलले होते. मुख्यमंत्रीपदासह इतर पदांबाबत झालेल्या वाटाघाटींची माहिती त्यांनी दिली होती. त्यामुळे ते खोटे बोलत आहेत, हा भाजपचा आरोप चुकीचा असून, त्यांनी मतदारांचा अपमान केला आहे. 
- अंबादास दानवे, आमदार 

खोटे बोलण्याची परंपरा नाही
शिवसेनेत खोटे बोलण्याची परंपरा नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका मांडली, त्यातील प्रत्येक शब्द खरा आहे. शिवसेनेवर आरोप करून भाजपने पाठीत खंजीर खुपसला आहे. भाजपच्या जागा कमी आल्या, नाहीतर त्यांनी शिवसेनेला विचारातदेखील घेतले नसते. भाजप शब्दावर ठाम नसल्याचे संपूर्ण राज्याने पाहिले.
- त्र्यंबक तुपे, माजी महापौर 

भाजपने स्वार्थ साधला
भाजपच्या सर्व नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत मातोश्रीचे उंबरठे झिजविले. लोकसभेत हेतू साध्य झाल्यानंतर शिवसेनेला कवेत घेण्याचा प्रयत्न केला. तरीही सरळ मार्गाने शिवसेनेने साथ दिली. विधानसभेतही बंडखोरी करून शिवसेना उमेदवारांना त्रास दिला. पूर्व मतदारसंघात सेनेने बंडखोरी केली असती तर भाजप विजयी झाले नसते.    - राजू वैद्य, विधानसभा संघटक

भाजपने विश्वासघात केला
भाजपने शिवसेनेसोबत विश्वासघात केला आहे. महायुतीचा निर्णय होताना जे ठरले होते. त्यानुसार भाजपने शिवसेनेसोबत वाटाघाटी करणे गरजेचे होते. परंतु दिलेला शब्द न पाळल्यामुळे भाजपच खोटारड्या भूमिकेने वागत असल्याचे दिसते आहे. ही पद्धत चुकीची आहे.    
- विजय वाघचौरे,     शहरप्रमुख

शिवसैनिकांमुळे जागा आल्या
भाजपच्या जिल्ह्यात ज्या जागा आल्या, त्या शिवसैनिकांनी घेतलेल्या परिश्रमामुळे आल्या आहेत. तिन्ही मतदारसंघांत शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. भाजपने शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही. जे ठरले होते, ते देण्याबाबत समोर येऊन देण्याची दानत पक्षाने दाखविणे गरजेचे होते. 
- ज्ञानेश्वर डांगे, उपशहरप्रमुख, मुकुंदवाडी 

भाजपला जागा दाखविण्याची वेळ
भाजपला त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ आहे. राजकारणात ठाकरे कुटुंबियांनी आजवर खोटेपणाची भूमिका घेतलेली नाही. तसे पाहिले तर शिवसेनेकडून उशिराच निर्णय झाला. निवडणुकीपूर्वीच हे व्हायला पाहिजे होते. शिवसेनेला संपविण्याचे भाजपचे स्वप्न सातजन्मात पूर्ण होणार नाही.
        - सुशील खेडकर, विधानसभा संघटक 

हिंदू मतदारांचा सेनेकडून अपमान 
सेना हिंदुत्वापासून पळाली 

शिवसेनेने खऱ्या अर्थाने समर्थन देण्याची वेळ होती; परंतु हिंदुत्वापासून शिवसेना पळाली आहे. हिंदुत्वाला साथ देण्याची वेळ असताना जनतेच्या मतांचा अवमान शिवसेनेने केला आहे. भाजपने काहीही चूक केलेली नाही. 
- संजय केणेकर, सभापती, म्हाडा 

भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे
भाजपच्या दुपटीने जागा आल्या आहेत. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. युती तुटू नये, हिंदुत्वासाठी तरी शिवसेनेने विचार करणे गरजेचे होते. खातेवाटपाबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना पुढे आलीच नाही.
- डॉ. भागवत कराड, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप 

युती केली तीच चूक झाली
विधानसभा निवडणुकीत युती केली, हीच चूक झाली. १०५ जागा भाजपच्या आलेल्या असताना मुख्यमंत्री शिवसेनेचा कसा होणार, हा प्रश्न आहे. आता लोक बोलू लागले आहेत. शिवसेनेने सोबत येणे गरजेचे होते. 
- एकनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष 

हिंदू मतदारांचा अपमान करू नये
हिंदू मतदारांनी युतीला मतदान केले आहे. त्या मतदारांचा अपमान करून शिवसेनेने काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार करून भाजपशी गद्दारी करणे योग्य नाही. असा विचार शिवसेना नेतृत्वाने करू नये. 
- शिरीष बोराळकर, प्रवक्ता, भाजप 

नेत्यांनी एकत्रित यावे
शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी एकत्रित बसून निर्णय घेणे अपेक्षित आहे. पक्ष नेतृत्वाच्या चर्चेने जे काही ठरले होते, त्यावर मार्ग निघू शकेल. सत्ता स्थापन करण्याची दोन्ही पक्षांची भूमिका असल्याचे दिसते. 
- पंकज भारसाखळे, माजी नगरसेवक 

शिवसेनेने सोबत राहिले पाहिजे
शिवसेनेने भाजपसोबत राहिले पाहिजे. दोन्ही पक्षांत काय ठरले होते, त्यामुळे खरे कोण आणि खोटे कोण? हे तर आम्हाला माहिती नाही; परंतु युतीसोबत शिवसेनेने राहिले पाहिजे. महायुती करून दोन्ही पक्ष मतदारांसमोर गेले होते.     
- किशनचंद तनवाणी, शहरप्रमुख 

Web Title: BJP break faith Vs insulting Hindu votes by Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.