वाढत्या रुग्णांमुळे औरंगाबादला जम्बो कोविड रुग्णालयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 07:12 PM2020-09-16T19:12:52+5:302020-09-16T19:14:46+5:30

एकाच छताखाली गंभीर आणि सामान्य कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विचार सुरु

Aurangabad needs Jumbo Covid Hospital due to increasing number of patients | वाढत्या रुग्णांमुळे औरंगाबादला जम्बो कोविड रुग्णालयाची गरज

वाढत्या रुग्णांमुळे औरंगाबादला जम्बो कोविड रुग्णालयाची गरज

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांकडून कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.शहरात सध्या गंभीर कोरोना रुग्णांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयसीयूमधील बेड वाढविण्याचे काम एका रात्रीतून होणे अशक्यप्राय आहे.

औरंगाबाद : कोरोना आजाराचे संक्रमण पुढील काही महिन्यांत कमी होईल याची कोणतीही शाश्वती नाही. आरोग्य यंत्रणेला आणि नागरिकांना कोरोनाशी अशाच पद्धतीने मुकाबला करीत राहावा लागणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या ज्या पद्धतीने वाढत आहे ती लक्षात घेता शहराला एका मोठ्या जम्बो कोविड रुग्णालयाची गरज भासणार आहे.

सध्या वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांकडून कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी शासनाला कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागत आहे. एकाच छताखाली गंभीर आणि सामान्य कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जम्बो रुग्णालय उभारण्याचा विचार महापालिका आणि जिल्हा प्रशासन करीत आहे. शहरात सध्या गंभीर कोरोना रुग्णांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याखालोखाल शहरातील खाजगी रुग्णालयांमध्येही कोरोनाचे गंभीर रुग्ण वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

महापालिकेकडूनही व्यापक प्रमाणात रुग्णांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यात प्रशासनाला संपूर्ण शक्ती पणाला लावावी लागत आहे. पदमपुरा, किलेअर्क, एमआयटी आदी ठिकाणी आॅक्सिजनची यंत्रणा उभारावी लागणार आहे. त्यासाठी लागणारा खर्च कोट्यवधींमध्ये जात आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही शेवटी यंत्रणा तात्पुरती स्वरूपाचीच राहणार आहे. मागील पाच दिवसांपासून शहरातील सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आयसीयूमधील बेड वाढविण्याचे काम एका रात्रीतून होणे अशक्यप्राय आहे. अशा परिस्थितीत नेमके करावे तरी काय, असा प्रश्न महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला पडला आहे.

जम्बो कोविड रुग्णालयाचा विचार
राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जम्बो कोविड रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. औरंगाबाद चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कंपनीच्या जागेवर २५० खाटांचे एक कोविड रुग्णालय राज्य शासनाकडून सुरू करून देण्यात आले. याठिकाणी रुग्णांसाठी आॅक्सिजनची यंत्रणा उभारण्यासाठी एक कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे.  20 के.एल. क्षमतेची आॅक्सिजन टँक उभारण्यात येणार आहे. कोट्यवधी  रुपये वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करण्यापेक्षा एकाच छताखाली एका मोठ्या मैदानात  जम्बो कोविड रुग्णालय सुरू करता येऊ शकते का, असा विचार प्रशासनाकडून सध्या सुरू आहे. 


4000 शहरी भागात रुग्ण
महापालिका हद्दीत सध्या चार हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील             काही महिन्यांत रुग्णसंख्या चार हजारांपर्यंत गेली नव्हती. मागील आठ ते दहा दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. 


रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढले
सहा महिन्यांपासून आरोग्य यंत्रणा कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहे. आतापर्यंत रुग्ण अचानक गंभीर होण्याचे प्रमाण जास्त दिसून येत नव्हते. आता कोरोना निदान झाल्यापासून पाचव्या दिवसापर्यंत रुग्णाला फारसा त्रास होत नाही. पाच ते नऊ या चार दिवसांच्या कालावधीत रुग्ण गंभीर होण्याच्या घटना वाढत आहेत. रुग्णाच्या लंग्समध्ये पाणी शिरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे, ही चिंतेची बाब असल्याचे महापालिकेतील वैद्यकीय सूत्रांनी नमूद केले. 

Web Title: Aurangabad needs Jumbo Covid Hospital due to increasing number of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.