Air India's Mumbai-Aurangabad flight delayed by five-and-a-half hours; Airline passengers are disappointed | एअर इंडियाच्या मुंबई-औरंगाबाद विमानाला साडेपाच तास विलंब; विमानातील प्रवाशांना मनस्ताप
एअर इंडियाच्या मुंबई-औरंगाबाद विमानाला साडेपाच तास विलंब; विमानातील प्रवाशांना मनस्ताप

ठळक मुद्दे ४.४५ चे विमान आले रात्री १० वाजता

औरंगाबाद : एअर इंडियाच्यामुंबई-औरंगाबाद विमानातील प्रवाशांना शुक्रवारी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. तांत्रिक कारणामुळे विमानाच्या उड्डाणाला साडेपाच तासांवर विलंब झाला. परिणामी, मुंबई विमानतळावर आबालवृद्धांसह प्रवाशांना गैरसोयीला तोंड द्यावे लागले. मुंबईहून सायंकाळी ४.४५ वाजता येणारे हे विमान रात्री १० वाजेच्या सुमारास दाखल झाले. एअर इंडियाच्या कारभाराविषयी प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

एअर इंडियाचे मुंबई-औरंगाबाद विमान (एआय-४४२) हे विमान दररोज दुपारी ३.२५ वाजता मुंबईहून उड्डाण घेते. त्यानुसार प्रवासी विमानतळावर दाखल झाले होते. मात्र, तांत्रिक कारणामुळे विमानाला दोन तास उशीर असल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. त्यानंतर ५ वाजता प्रवासी विमानात दाखल झाले; परंतु तोपर्यंतही विमानातील दोष दूर झालेला नव्हता. जवळपास अडीच तास प्रवासी विमानात बसून होते. सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. त्यासाठी ३० मिनिटे लागणार असल्याचे सांगण्यात आले.
या विमानातून प्रवासी उतरून दुसऱ्या विमानात दाखल झाले; परंतु त्यानंतरही विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला. रात्री ९.१५ वाजता हे विमान औरंगाबादसाठी झेपावले. तोपर्यंत प्रवाशांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. विमानातील खाद्यपदार्थ संपले होते, तरीही खाद्यपदार्थही उपलब्ध करून देण्यात आले नाही.

या विमानात बंगळुरूहून सहलीसाठी येणाऱ्या २० शालेय विद्यार्थ्यांचा ग्रुप होता. त्यांच्यासह विमानातील प्रवाशांना फक्त पाणी उपलब्ध करून देण्यात आले. पाच तासांहून अधिक वेळ लागल्यामुळे प्रवासी भुकेने व्याकूळ झाले होते. यामध्ये लहान मुलांची सर्वाधिक गैरसोय झाली. रात्री १० वाजता हे विमान चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. यावेळी अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला. याच विमानात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरदेखील होत्या. त्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. हे विमान सायंकाळी ४.४५ वाजता आल्यानंतर दररोज ५.२० वाजता दिल्लीसाठी उड्डाण घेते. मात्र, त्याला विलंब झाला. त्यामुळे दिल्लीसाठी जाणारे प्रवासीही विमानतळावर ताटकळले होते. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

बाहेर थांबवायला हवे होते
प्रवाशांना विमानात बसविण्याऐवजी बाहेर थांबवायला पाहिजे होते. तब्बल दोन तास विमानात बसवून ठेवले. त्यानंतर दुसऱ्या विमानात बसविले, तरीही ते विमान तात्काळ रवाना झाले नाही. एअर इंडियाने योग्य नियोजन करायला पाहिजे होते. यामुळे नियोजन विस्कळीत झाले.
-विजया रहाटकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग


भयावह अनुभव
मुंबई-औरंगाबाद विमान प्रवासात भयावह अनुभव आला. विमानाला विलंब होत असताना अल्पोपाहारही देण्यात आलेला नाही. सहलीसाठी येणाऱ्या मुलांची सर्वाधिक गैरसोय झाली. दिल्लीला जाणारे प्रवासीही मध्यरात्री जातील. त्यामुळे मुंबईसाठी आणखी एक विमान गरजेचे आहे.
- सीए उमेश शर्मा


समन्वयाचा अभाव
एअर इंडियाकडून समन्वय आणि संवादाचा अभाव दिसून आला. उद्या बैठक आहे. त्यासाठी औरंगाबादला आलो; परंतु विमानाला खूप उशीर झाला. प्रवाशांना प्रचंड त्रास झाला. 
- बिशन सिंग, प्रवासी

औरंगाबाद-उदयपूर, हैदराबाद विमान रद्द
विमानाच्या उपलब्धतेमुळे शुक्रवारी एअर इंडियाच्या औरंगाबाद-उदयपूर या विमानाचे उड्डाण रद्द झाले. केवळ मुंबईसाठी या विमानाने उड्डाण घेतले. हे विमान मुंबई-भोपाळ-औरंगाबाद-मुंबई असे चालविण्यात आले. मुंबई येथून प्रवासी उदयपूरला गेल्याची माहिती एअर इंडियाच्या सूत्रांनी दिली. पूर्वनियोजनप्रमाणे ट्रू जेटचे औरंगाबाद-हैदराबाद विमानही रद्द होते.

Web Title: Air India's Mumbai-Aurangabad flight delayed by five-and-a-half hours; Airline passengers are disappointed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.