Accused driver goes out in case of truck theft | ट्रक चोरीच्या प्रकरणात फिर्यादी चालकच निघाला आरोपी 
ट्रक चोरीच्या प्रकरणात फिर्यादी चालकच निघाला आरोपी 

ठळक मुद्देपाथर्डी पोलिसांनी ठाण्यात गुन्हा दाखल असून ट्रक जप्त असल्याचे सांगितले.फिर्यादी ट्रक चालक व त्याचे दोन साथीदार पाथर्डी तालुक्यात चोरीसाठी गेले होते

पैठण : शुक्रवारी पैठण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी ट्रक चालकास झाडाला बांधून ट्रक पळवून नेल्याची फिर्याद देणारा फिर्यादी ट्रक चालकच या प्रकरणात आरोपी असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण व पैठण पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. फिर्यादी ट्रक चालक व त्याचे दोन साथीदार पाथर्डी तालुक्यातील तीसगाव येथील रिलायन्स टॉवर च्या बँटऱ्या चोरून नेत असताना पाथर्डी पोलिसांनी पाठलाग केल्याने ट्रक तेथेच सोडून पळून आले होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ट्रक चालक व त्याच्या दोन साथीदारांनी बनाव रचून पैठण पोलीस ठाण्यात मारहाण करून ट्रक पळवून नेल्याची फिर्याद दिली होती.

पैठण पाचोड रोडवर गुरुवारी रात्री १०.३० वाजेच्या दरम्यान  अज्ञात दुचाकी चालकांनी डोळ्यात मिरची टाकून शस्त्राचा धाक दाखवून झाडाला बांधून टाकले व आपला ट्रक पळवून नेला अशी फिर्याद पाचोड येथील ट्रक चालक विशाल दुर्बे याने शुक्रवारी पैठण पोलीस ठाण्यात दिली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे अन्वेषण चे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे व पैठण पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी गतीने तपासाची चक्रे फिरवली. ट्रक चालक विशाल याच्या जबानीत वेळोवेळी विसंगती येत असल्याने त्याच्यावर संशय वाढला. पोलीस निरीक्षक फुंदे व देशमुख यांनी विशाल यास विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने सर्व घटनाक्रम सांगितला.

तीसगावला केली चोरी...
पाचोड येथील मिनीट्रक चालक विशाल दुर्बे व त्याचे पाचोड येथील साथिदार मिथुन वर्मा व वैभव वरात यांनी गुरूवारी पाथर्डी तालुक्यातील तीसगाव येथील रिलायन्स टॉवर ची केबीन तोडून केबीन मधील २४ बँटऱ्या काढून ट्रक मध्ये टाकल्या व शेवगाव मार्गे पैठणकडे निघाले दरम्यान त्यांचा पाठलाग पोलिसांनी सुरू केला. पोलीस पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्याने तीघांनीही ट्रक सोडून पलायन केले. शुक्रवारी तीघेही पाचोड येथे भेटले व पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी कट रचला.

असा रचला कट 
पैठण पाचोड रोडवर मारहाण करून चोरट्यांनी ट्रक पळवून नेला अशी फिर्याद दिलीतर आपल्यावर शंसय येणार नाही असे ठरवून त्यांनी कट रचला.शुक्रवारी मिथुन वर्मा व वैभव वरात या दोघानी ट्रक चालक विशाल दुर्भे यास पैठण पाचोड रोडवरील रहाटगाव शिवारातील एका झाडास बांधले, त्याच्या अंगावर मिरची पावडर टाकली. थोड्या वेळाने त्याला सोडले व पैठण पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितले. परंतू घटनाक्रम सांगताना ट्रकचालक गोंधळून गेला व पोलिसांचा संशय खरा निघाला.

पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पैठण पोलिसांनी ट्रकचालकाने दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी पोलीसांना संपर्क साधला असता या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून ट्रक जप्त असल्याचे सांगितले.

आरोपी विरुद्ध बी समरी पाठवणार
पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने खोटी फिर्याद दिल्याने या प्रकरणाची बी समरी न्यायालयास पाठविणार असल्याचे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी सांगितले. दरम्यान आरोपी ट्रकचालक विशाल दुर्बे यास पाथर्डी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून फरार असलेल्या मिथुन वर्मा व वैभव वरात यांचा शोध घेण्यात येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Accused driver goes out in case of truck theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.