10 lakh worth of Deshi Daru liquor burnt in accident with tempo; Disappointment of Taliram who ran to the accident site | टेम्पोसह १० लाखांची देशी दारू भस्म; अपघातस्थळी धाव घेतलेल्या तळीरामांची निराशा

टेम्पोसह १० लाखांची देशी दारू भस्म; अपघातस्थळी धाव घेतलेल्या तळीरामांची निराशा

ठळक मुद्देविजेच्या पोलवर वाहन आदळून घडली घटना वाहनावर तार पडल्याने क्षणार्धात सगळे भस्म झालेचालकाने बाहेर उडी मारल्याने जीवितहानी टळली

पिशोर ( औरंगाबाद ) : देशी दारूने भरलेले वाहन विजेच्या मुख्य खांबावर आदळल्याने वीजतार पडून लागलेल्या आगीत वाहनासह संपूर्ण देशी दारू भस्म झाली. ही घटना रविवारी दुपारी डोंगरगाव शेलाटी फाट्यानजीक बाबरा रस्त्यावर घडली. या आगीत दहा लाखांची देशी दारू व वाहनासह सुमारे १३ लाखांच्या मुद्देमालाचा कोळसा झाला.

औरंगाबाद येथून कन्नड तालुक्यातील चिंचोली तसेच सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील परवानाधारक देशी दारू दुकानात देशी दारूचा पुरवठा करण्यात येतो. रविवारी वाहन (क्र. एमएच २० डीई ४२५१) देशी दारुचे बॉक्स भरून बाबरा - नाचनवेल रस्त्यावरून जात होते. डोंगरगाव - शेलाटी फाट्यानजीक असलेल्या छोट्या वळणावर चालक गणेश कळम यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीज पुरवठ्याच्या मुख्य खांबावर हे वाहन जोराने आदळले. यात वीज तार तुटून वाहनावर पडल्याने आग लागली. दारूने पेट घेतल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. यामुळे संपूर्ण देशी दारूसह वाहनाचा कोळसा झाला. पिशोर पोलीस ठाण्याचे सपोनि. बालाजी वैद्य यांनी स. उपनिरीक्षक माधव जरारे, चालक सरवर पठाण यांच्यासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. औरंगाबाद येथून मालक नरेंद्र जैस्वाल हेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. या आगीत सुमारे दहा लाखांची देशी दारू तसेच वाहन असे सुमारे तेरा लाख रुपयांच्या मुद्देमालाचा कोळसा झाल्याचे सपोनि. वैद्य यांनी सांगितले.

तळीरामांची निराशा
देशी दारूच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी पंचक्रोशीत पसरताच तळीरामांनी हातची कामे सोडून तिकडे धाव घेतली. मात्र, तेथे गेल्यानंतर वाहनाने संपूर्ण पेट घेतलेला असल्याने त्यांच्या हाती काहीही पडले नाही. यामुळे त्यांचा हिरमोड झाला.

उडी मारल्याने वाचला चालक
वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन विजेच्या खांबाला धडकल्याने वीज तार तुटून आग लागली. यात चालक गणेश कळम यांनी तत्काळ उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला. वाहनात इतर कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. दारू ज्वलनशील पदार्थ असल्याने घटनास्थळी मोठी आग लागली होती.

Web Title: 10 lakh worth of Deshi Daru liquor burnt in accident with tempo; Disappointment of Taliram who ran to the accident site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.