Asian Games 2018 : अडथळ्यांचा मॅरेथॉननंतरही 'स्वप्नवत' सुवर्णपदक; स्वप्ना बर्मनला सलाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 14:11 IST2018-08-30T14:05:34+5:302018-08-30T14:11:31+5:30
स्वप्नाचे वडिल रिक्षाचालक होते. घरची परिस्थिती बेताची होती. हा खेळ घरच्यांपासून गावातल्या लोकांनाही माहिती नव्हता. त्यामुळे स्वप्ना नेमकी काय करते हे घरच्यांना माहिती नव्हते. त्यामुळे स्वप्ना मेहनत घेत असताना तिला पाठिंबा मिळाला नाही.

Asian Games 2018 : अडथळ्यांचा मॅरेथॉननंतरही 'स्वप्नवत' सुवर्णपदक; स्वप्ना बर्मनला सलाम
नवी दिल्ली : अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. पण जिद्द, गुणवत्ता आणि मेहनत या त्रिसूत्रीच्या जोरावर काही जणंच यश मिळवतात. कारण त्यांच्या मनगटामध्ये असते ती परिस्थिती बदलण्याची ताकद. दोन दिवसांपूर्वी स्वप्ना बर्मन हे नाव तुमच्या गावीही नव्हते. हेप्टॉथ्लॉन हा खेळ आहे, हे तुम्हाला माहितीही नसेल. पण आशियाई क्रीडा स्पर्धा सुरु असताना, या खेळात सुवर्णपदक मिळालं आणि स्वप्ना भारतीयांच्या गळ्यातील ताईत झाली.
स्वप्नासाठी हे पदक मिळवणं सोपं नव्हतं. कारण मुळात खेळ महाकठिण असाच. या खेळात अॅथलेटीक्सच्या सात प्रकारांचा समावेश असतो. यामध्ये 200 मी. आणि 800 मी. धावण्याची शर्यत होते. त्याचबरोबर 100 मी. अडथळ्याची शर्यत खेळवली जाते. त्यानंतर उंच उडी. लांब उडी, गोळाफेक आणि भालाफेक या प्रकारांचा समावेश असतो. स्वप्नाने या सातही खेळात मिळून 6026 गुण पटकावत सुवर्णपदकाला गवसणी घातली. पण हे पदक पटकावताना तिला अनंत अडचणींचा सामना करावा लागला.
स्वप्नाच्या दोन्ही पायांना मिळून 12 बोटे आहेत. प्रत्येक पायाला सहा. त्यामुळे शूज घालून खेळताना तिला समस्या जाणवते. तिला काही जणांनी शस्त्रक्रीया करून एक बोट काढण्यासही सांगितले. पण स्वप्नाने ते ऐकले नाही. त्यानंतर आपल्या पायासाठी तिला खास शूज घ्यावे लागले.
स्वप्नाचे वडिल रिक्षाचालक होते. घरची परिस्थिती बेताची होती. हा खेळ घरच्यांपासून गावातल्या लोकांनाही माहिती नव्हता. त्यामुळे स्वप्ना नेमकी काय करते हे घरच्यांना माहिती नव्हते. त्यामुळे स्वप्ना मेहनत घेत असताना तिला पाठिंबा मिळाला नाही. त्याचबरोबर 2013 सालापासून तिच्या वडिलांना गंभीर आजार झाला होता. तेव्हापासून ते अंथरुणाला खिळून आहेत.
स्वप्ना सातही प्रकारांमध्ये दमदार कामगिरी करत असताना तिचे दात दुखत होते. डोक्यात कळ जात होती. पण तरीही ती आपल्या ध्येयापासून दूर गेली नाही. एकामागून एक अनंत अडचणींचा सामना करत स्वप्नाने सुवर्णपदक पटकावले, त्यामुळे तिला कुर्निसात करावाच लागेल.