लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील गुलशननगर येथे एका २४ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करून त्याचा खून करण्यात आला. शनिवारी ५ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता दरम्यान ती थरारक घटना घडली. तेजस ऊर्फ अनिकेत अविनाश नळकांडे (वय २४, रा. मायानगर, अमरावती) असे मृत तरुणाचे नाव आहे.
या घटनेतील मारेकऱ्यासह त्याच्या साथीदाराला सीपींच्या स्पेशल स्कॉडचे प्रमुख तथा पीआय चोरमले यांच्या पथकाने काही तासातच शेगाव येथून पकडले. घरगुती वादाला जबाबदार ठरवत तेजसला संपविण्यात आले, असा घटनाक्रम उघड झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी उमर युनूस चौधरी (वय २०, रा. गुलशनगर, अमरावती) आणि शहजाद खान नूर खान (२८, रा. सुफियाना पार्क, अमरावती) यांना अटक केली आहे.
काही तासातच पकडलेउमर युनूस चौधरी हा त्याचा मित्र शहजाद खान याने दिलेल्या दुचाकीने पळाला. तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगावला पोहोचल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला पाठलाग करुन शेगाव येथून पकडले. तसेच चौकशीमध्ये त्याला दुचाकी देऊन सहकार्य करणाऱ्या शहजाद खान नूर खान यालासुद्धा ताब्यात घेतले.
तेजस हा दोन वर्षांपासून गुलशननगर येथील शेख अकील यांच्या कारवर चालक होता. शनिवारी रात्री शेख अकील यांचे पत्नीसोबत जोरदार भांडण झाले. हा वाद सुरूच असताना शेख अकीलचा सावत्र मुलगा उमर युनूस चौधरी तेथे आला.
अशी घडली घटनारात्री १० नंतर उमर युनूस घरी पोहोचला. आमच्या घरात होणाऱ्या वादासाठी तूच जबाबदार आहे, असा ठपका ठेवत त्याने तेजसवर चाकूने वार केले. पाठलाग करून नवसारी चौकात पुन्हा त्याच्यावर वार केले. यामध्ये तेजस रक्तबंबाळ झाला. दरम्यान, गंभीर अवस्थेत शेख अकील शेख कयुम हा तेजसला घेऊन इर्विन रुग्णालयात पोहोचला. मात्र, डॉक्टरांनी तेजसला मृत घोषित केले. याप्रकरणी तेजसच्या वडिलांना रात्री ११:३० च्या सुमारास त्याचा अपघात झाल्याचे शेख अकिल यांनी सांगितले.