इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करून विद्यार्थिनीची बदनामी, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 16:47 IST2022-01-11T16:29:41+5:302022-01-11T16:47:45+5:30
एका तरुणाने सोशल माध्यमावर तरुणीचे फेक अकाउंट बनवून त्यावर तिचे फोटो टाकून बदनामी केली.

इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करून विद्यार्थिनीची बदनामी, गुन्हा दाखल
अमरावती : एका महाविद्यालयीन तरुणीचे इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट बनवून त्यावर त्या मुलीचे ओरिजनल छायाचित्रे टाकून बदनामी केल्याचा प्रकार येथे उघड झाला. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी विराज चोपडे (रा. अमरावती) विरुद्ध विविध कलमांसह आयटी व पोस्को ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, ती अल्पवयीन मुलगी व विराज हे दहावीपर्यंत सोबत शिकले. त्यानंतर दोघे एकाच कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशले. मात्र, मुलीने विज्ञान शाखा निवडली, तर विराज हा कला शाखेत शिकत होता. ती त्याच्याशी बोलतदेखील नसताना तो तिला बोलण्यासाठी प्रवृत्त करीत होता.
ती आपल्याशी बोलत नाही, बघत नाही, भाव देत नाही याचा राग त्याच्या मनात होता. त्याने तिचा पाठलाग केला. न बोलल्यास जिवानिशी ठार मारण्याची धमकीदेखील त्याने दिली. तसेच महाविद्यालयातदेखील तिची बदनामी केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर पुढे जाऊन त्याने इन्स्टाग्रामवर तिच्या नावाने बनावट अकाउंट काढले. त्यावर तिचेच फोटो अपलोड करून तिचीच बदनामी चालविली.
गंभीरतेने दखल
जून २०२१ ते १० जानेवारी २०२२ या कालावधीत त्याने नाहक बदनामी केल्याची तक्रार त्या मुलीने १० जानेवारी रोजी सायंकाळी गाडगेनगर पोलिसांत नोंदविली. ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांनी तिचे बयाण नोंदवून घेत विराज चोपडेविरुद्ध गुन्हा नोंदविला.