'तू जा, नाही तर तुझाही.. ' चुलतभावानेच दिली दहा लाखांची सुपारी; पेट्रोल पंपचालकाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 16:19 IST2025-09-26T16:17:54+5:302025-09-26T16:19:06+5:30
अंजनगाव बारी रोडवरील घटनाः दोन अल्पवयीन मुलांनी रस्त्यावरच संपविले, आठ जण ताब्यात

'You go, or else yours too..' Cousin gave a betel nut worth one million; Petrol pump operator murdered
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती/बडनेरा : पेट्रोल पंपाच्या वादातून सख्ख्या चुलतभावानेच पेट्रोल पंप चालक असलेल्या चुलतभावाची हत्या घडवून आणली. तब्बल दहा लाख रुपयांमध्ये ती सुपारी घेत दोन अल्पवयीन मुलांकडून तो खून करवून घेण्यात आला. मिलिंद मुरलीधर लाड (४२, रा. बारीपुरा, जुनी वस्ती, बडनेरा), असे मृताचे नाव आहे. तर या प्रकरणी त्यांच्या खुनाची सुपारी देणाऱ्या विक्रम राजेंद्र लाड (३२, बडनेरा) याच्यासह आठ संशयिताना ताब्यात घेण्यात आले आहे.
बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील राम मेघे कॉलेज ते हॉटेल रानमाळ दरम्यान २४ सप्टेंबर रोजी रात्री ९:३० च्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक तपासानुसार, मिलिंद यांचा चुलतभाऊ विक्रम याने पेट्रोलपंप मालमत्तेच्या वादातून ८ ते १० लाख रुपयांमध्ये त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची बाब उघड झाली आहे. मिलिंद लाड यांच्या मालकीचा अंजनगाव बारी रोडवर नायरा पेट्रोल पंप आहे. बडनेरा पोलिसांनी मृताचा चुलतभाऊ गजानन लाड यांच्या तक्रारीवरून २५ सप्टेंबर रोजी पहाटे ०२:५५ वाजेच्या सुमारास अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तथा लाड यांचा खून करणाऱ्या दोन विधिसंघर्षित बालकांना गुरूवारी पहाटेच ताब्यात घेतले. त्यातून लाड यांचा खून 'कॉन्ट्रॅक्ट किलिंग असल्याच्या निष्कर्षाप्रत पोलिस पोहोचले आहेत.
काम विचारण्यास गेलेल्यांनी केला पाठलाग
चंदन मोरे हा पेट्रोल पंपावर असताना दोन अनोळखी मुले तेथे आली. पेट्रोल पंपावर काम आहे का, अशी विचारपूस करून ते निघून गेले. त्यानंतर रात्री ०९:३० वाजेच्या सुमारास मोरे व मिलिंद लाड हे पेट्रोल पंपाहून दुचाकीने राम मेघे कॉलेज चौक ते हॉटेल रानमाळ रोडने घरी जात होते. लाड हे दुचाकी चालवीत होते, तर मोरे हा मागे बसला होता. त्याचवेळी पेट्रोल पंपावर काम विचारण्यासाठी आलेली तीच दोन मुले मागून दुचाकीने आली. त्यापैकी एकाने मिलिंद यांच्या खांद्यावर चाकू खुपसला. त्यामुळे दोघेही दुचाकीसह खाली पडले. त्या दोघांनी पुन्हा मिलिंद यांच्यावर चाकूने वार केले. 'तू जा, नाही तर तुझाही जिव घेऊ', अशी धमकी त्यांनी चंदनला दिली.
"पेट्रोल पंपाच्या वादातून ती हत्या सुपारी देऊन घडवून आणल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. दोन विधिसंघर्षित बालकांसह सात ते आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे."
- गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त