'आम्ही महादेव खोरीचे भाई आहोत, ओळखत नाही का?' म्हणत तरुणाची निघृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 18:56 IST2026-02-13T18:54:28+5:302026-02-13T18:56:00+5:30
नांदगाव पेठमध्ये थरार : गाडीचा कट, क्षणात आवळल्या आरोपींच्या मुसक्या, १५ पर्यंत पीसीआर

'We are brothers of Mahadev Khori, don't you know?' Brutal murder of a young man
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : 'आम्ही महादेव खोरीचे भाई आहोत', अशी गर्जना करत तिघांनी मिळून एका तरुणाची चाकूने सपासप वार करून हत्या केली. गौरव सुधाकर घोटेकार (३४, रा. अंजनगाव सुर्जी) असे या घटनेतील मृताचे नाव आहे.
ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री ८:४५ च्या सुमारास नांदगाव पेठ टोलनाक्याजवळील सर्व्हिस रोडवर घडली. या घटनेत गौरवचा भाऊ सौरभघोटेकार (३०) हादेखील जखमी झाला आहे. याप्रकरणी, नांदगाव पेठ पोलिसांनी सौरभच्या तक्रारीवरून तीनही आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला तथा काही तासात तिघांनाही बेड्या ठोकल्या. तिघांनाही १५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अंजनगाव सुर्जी येथील मूळ रहिवासी असलेले सौरभ आणि गौरव हे नांदगाव पेठ येथील नमन विहार येथे राहात होते. बुधवारी रात्री दोन्ही भाऊ रेमंड कंपनीतील काम आटोपून जेवण करून दुचाकीने घरी परतत होते.
झपकन चाकुच काढला
नांदगाव पेठ स्टॅण्डजवळील सर्व्हिस रोडवरील एका स्पीड ब्रेकरजवळ मागून आलेल्या ट्रिपल सीट दुचाकीने त्यांच्या गाडीला जोरात धडक दिली. धडक लागल्याचा जाब विचारला असता, आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. हमको जानते नही क्या? हम महादेव खोरी के भाई लोग है, असे म्हणत आरोपींनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.
गौरवचे वाटेतच सोडले प्राण
वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि आरोपी आदेश तेलमोरे याने आपल्याजवळील धारदार चाकू काढून गौरवच्या दोन्ही पायांच्या मांडीवर खोलवर वार केले. गौरव रक्ताच्या थारोळ्यात कोसळला असतानाच, सौरभवाचवण्यासाठी धावला असता त्याच्यावरही हल्ला करण्यात आला. दोन्ही भावांवर हल्ला करून ते पसार झाले. उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना गौरवचा वाटेतच मृत्यू झाला.
पोलिसांची तत्परता
- नांदगाव पेठ पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेश दहातोंडे यांनी घटनेची माहिती मिळताच तत्काळ चक्रे फिरवली. या थरारक गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेची मदत घेण्यात आली.
- गुन्हे शाखाप्रमुख संदीप चव्हाण यांच्या टीमने तांत्रिक माहितीच्या आधारे आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचा शोध घेतला. ठाणेदार दिनेश दहातोंडे आणि संदीप चव्हाण यांच्या संयुक्त पथकाने आदेश तेलमोरे (२५), दीप उर्फ यशोदीप विनायक वेलकर (२५) आणि रोहित संजय तायडे (२३, तिन्ही रा. महादेवखोरी, अमरावती) या तिन्ही आरोपींना काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत.
- क्षुल्लक कारणावरून 'भाईगिरी' दाखवत एका तरुणाचा जीव घेणाऱ्या या गुंडांमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. आता तिघांनाही पोलिस कोठडी मिळाली आहे. त्यातून अधिक उलगडा होईल.