पश्चिम विदर्भातील १६३ गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 19:46 IST2019-11-07T19:46:23+5:302019-11-07T19:46:26+5:30
सर्वत्र पावसाचा कहर सुरू असला तरी अमरावती विभागातील सहा तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला.

पश्चिम विदर्भातील १६३ गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट
- गजानन मोहोड
अमरावती : सर्वत्र पावसाचा कहर सुरू असला तरी अमरावती विभागातील सहा तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. परिणामी भूजल पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे या तालुक्यातील १६३ गावांमधील भूजलात १ ते ३ मीटरपर्यंत तूट आल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण विभाग (जीएसडीए) च्या ४,८३२ निरीक्षण विहिरींच्या नोंदीद्वारे नोंदविले गेले. या गावांमध्ये यंदा पाणीटंचाई राहणार आहे. याविषयीचा अहवाल प्रशासनाला देण्यात आला आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे पावसाळ्यानंतर विभागातील नियमित निरीक्षणाच्या ६५३ विहिरी व नव्याने स्थापित केलेल्या ४१६९ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पाणीपातळीच्या नोंदींचा पावसाच्या नोंदीशी तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष पुढे आला. विभागात सहा तालुक्यांत सरासरीच्या ३० टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झालेला आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात ३९ गावांमध्ये भूजलस्तर १ ते ३ मीटरपर्यंत घटले. यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ तालुक्यात १४ गावे, घाटंजी तालुक्यात १४ गावे, कळंब तालुक्यात ६ गावे, केळापूर तालुक्यात ४८ गावे, तर राळेगाव तालुक्यात ९ गावंमधील भूजलात घट झाल्याने यंदा पाणीटंचाईचे सावट राहणार असल्याचा ‘जीएसडीए’चा नित्कर्ष आहे.
पश्चिम विदर्भात एकूण ५६ पैकी ५२ तालुक्यांत अद्यापही पुरेसे भूजल पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ४५६ गावांमध्ये भूजल १ मीटरपर्यंत घटले. अकोला जिल्ह्यात सात तालुक्यांमधील ३०० गावे, यवतमाळ जिल्ह्यात १६ तालुक्यांतील ६३५ गावे, बुलडाणा जिल्ह्यात १० तालुक्यांतील १५० गावे व वाशिम जिल्ह्यात सहा तालुक्यांतील ९४ गावांत अद्यापही भूजलात १ मीटरपर्यंत तूट आलेली असल्याचा भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल आहे.
बॉक्स
टंचाई राहणारे तालुके, गावांची भूजल स्थिती
जिल्हा तालुका २ ते ३ मी १ ते २ मी एकूण
अमरावती भातकुली १६ २३ ३९
यवतमाळ घाटंजी ०७ ४० ४७
यवतमाळ कळंब ०० ०६ ०६
यवतमाळ केळापूर ०२ ४६ ४८
यवतमाळ राळेगाव ०० ०९ ०९
यवतमाळ यवतमाळ ०१ १३ १४
एकूण ०६ २६ १३७ १६३
बॉक्स
भूजलाचा उपसा अन् टंचाईची कारणे
पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पिकासाठी तसेच बहुवार्षिक पिकांसाठी भूजलाचा झालेला अमर्याद उपसा, विंधन विहिरीद्वारे अतिखोल जलधारांतून होत असलेला भूजलाचा उपसा, सिंचनासाठी वापरण्यात येत असलेली पारंपरिक प्रवाही पद्धत व त्याद्वारे पाण्याचा अपव्यय, पाण्याचे नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव आदी कारणांमुळे भूजलाचा अमर्याद उपसा होत आहे. त्याच्या तुलनेत या तालुक्यांमध्ये २० ते ३० मिमी पर्जन्यमान कमी झाल्याने पाणीसंकट ओढवणार आहे.