विदर्भाची सांस्कृतिक राजधानी ड्रग्ज माफियांच्या विळख्यात; स्थानिक यंत्रणांच्या डोळ्यादेखत बाजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 19:44 IST2026-02-04T19:43:55+5:302026-02-04T19:44:56+5:30
Amravati : विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावतीत अमली पदार्थांच्या काळाबाजाराने पाळेमुळे घट्ट रोवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Vidarbha's cultural capital under the control of drug mafia; Market under the watchful eyes of local agencies
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावतीतअमली पदार्थांच्या काळाबाजाराने पाळेमुळे घट्ट रोवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अहमदाबाद डीआरआयच्या पथकाने रविवारी नवसारी-चांगापूर रोडवर केलेल्या धडक कारवाईत पाच किलो एमडी ड्रग्जसह चार आरोपींना बेड्या ठोकल्या. या कारवाईने अमरावती आता ड्रग्ज माफियांचे मोठे 'ट्रान्झिट पॉईट' बनल्याचेही स्पष्ट झाले आहे.
कारवाईत जप्त करण्यात आलेले पाच किलो एमडी हे केवळ हिमनगाचे टोक असल्याचे मानले जात आहे. अटक करण्यात आलेले चारही आरोपी सध्या ४ फेब्रुवारीपर्यंत कोठडीत आहेत. त्यांच्या न्यायालयीन कोठडीसंदर्भात बुधवारी होणारी सुनावणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या कारवाईमुळे अमरावतीमधील ड्रग्जच्या वितरणाचे जाळे किती विस्तीर्ण आहे, याचा पर्दाफाश झाला आहे.
स्थानिक यंत्रणांच्या डोळ्यादेखत ड्रग्जचा बाजार म्हणजे, एकाच वेळी पाच किलो एमडी पकडले जाणे ही डीआरआयची विदर्भातील दुसरी सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे. विशेष स्थानिक पोलिसांना या तस्करीचा सुगावा लागण्यापूर्वीच अहमदाबादच्या पथकाने अमरावतीत येऊन हा सर्जिकल स्ट्राईक केला. शहरात आतापर्यंत अमली पदार्थांची खेप पकडली जात असली तरी एमडीपर्यंत शहराने घेतलेली झेप ही धोकादायक ठरली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची मागणी वाढली आहे आणि त्याची रीतसर वितरण साखळी तयार झाली आहे, ही बाब अमरावतीकरांच्या भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे. हे आरोपी केवळ माल वाहून नेणारे 'कॅरिअर' नसून, त्यांच्यामागे मोठी आंतरराज्यीय टोळी कार्यरत असल्याचा संशय बळावला आहे.
मध्य प्रदेश कनेक्शन आणि गोपनीय तपास
मिळालेल्या माहितीनुसार, हे अमली पदार्थ शेजारच्या मध्य प्रदेश राज्यातून आणले जात असल्याची चर्चा आहे. डीआरआयच्या पथकाने यावर अधिकृत भाष्य टाळले असले तरी तपासाची दिशा मध्य प्रदेशातील निर्मिती केंद्रांकडे वळली आहे. अमरावती शहराचा वापर केवळ साठवणुकीसाठी होत होता की इथून मोठ्या प्रमाणात किरकोळ विक्री सुरू झाली होती, याचा शोध आता दोन वरिष्ठ अधिकारी शहरात तळ ठोकून घेत आहेत.
उद्याच्या सुनावणीकडे अमरावतीकरांचे लक्ष
डीआरआयचे पथक मुख्य आरोपींसह अहमदाबादकडे रवाना झाले असले तरी शहरातील गुन्हेगारी विश्वात या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली. बुधवारी होणाऱ्या सुनावणीत आरोपींच्या वाढीव कोठडीतून ड्रग्ज रॅकेटमधील अमरावतीतील 'पांढरपेशी' सूत्रधारांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. या बड्या कारवाईने अमरावतीच्या तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यात ओढणाऱ्या रॅकेटचे धाबे दणाणले आहे.