पैशांचे आमिष दाखवून धर्मपरिवर्तनाचे प्रलोभन ? विहिंप व बजरंग दलाची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:47 IST2026-01-01T14:45:51+5:302026-01-01T14:47:17+5:30
विहिंप व बजरंग दलाची तक्रार : ख्रिस्ती धर्मप्रचारकांसह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल

VHP and Bajrang Dal complain about religious conversion by offering money
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड/मोर्शी : वरूड तालुक्यातील बेनोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिंगोरी येथे दाखल झालेल्या आठ जणांनी पैशांचे प्रलोभन देऊन धर्मपरिवर्तनाचे आमिष दाखविल्याची तक्रार बेनोडा पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली. त्यावरून पोलिसांनी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनाक्रमामुळे मंगळवारी ३० डिसेंबरला दिवसभर शिंगोरी येथे तणावाचे वातावरण होते.
याप्रसंगी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने तक्रार दाखल केली. त्यानुसार, मोर्शी तालुक्यातील हिवरखेड ते वरूड तालुक्यातील लोणी मार्गावर असलेल्या शिंगोरी येथे ३० डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता वाढदिवसाच्या कार्यक्रमात ख्रिस्ती पादरी धर्माचा प्रचार करीत होते. इतर धर्माला कमी लेखून आणि उपस्थितांना पैशांचे प्रलोभन देऊन ख्रिस्ती धर्मात सामील होण्याचे आवाहन केले जात होते. ही बाब लोणी येथील बजरंग दल कार्यकर्त्यांना माहिती होताच त्यांनी पडताळणी करून त्यांचा मनसुबा उधळून लावला. पोलिसांना पाचारण केले.
पोलिस तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने त्यांच्यात वादावादी झाली. दरम्यान आ. उमेश यावलकर यांनी रात्री उशिरा बेनोडा येथील ठाणेदारांना कॉल केल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींना अटक करण्यात आली. रात्री ३ वाजता एफआयआरची प्रत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाला देण्यात आली. नितीन कुबडे, निखिल बोडखे, योगेश अडलक, सुकेश भोपती, पवन साखरे, मॉन्टी नागदेवे, अतिश कालबेडे, जय वडस्कर आदी यावेळी उपस्थित होते.