अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने हिवाळी २०२० परीक्षांची तयारी सुरू केली आहे. त्याअनुषंगाने नियमित व बॅकलॉग अशा दोन्ही विद्यार्थ्यांचे सुमारे तीन लाख परीक्षा फाॅर्म पडताळणी करण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला आहे. हे परीक्षा फाॅर्म शुक्रवारपासून स्वीकारण्यास आरंभ झाले आहे.‘पाच जिल्हे-चार दिवस’ असे परीक्षा अर्ज स्वीकारण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. १९ ते २२ मार्च यादरम्यान अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व बुलडाणा या पाचही जिल्ह्यांतील महाविद्यालयांतून ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा अर्ज गोळा करण्यात येणार आहेत. त्याकरिता विद्यापीठाच्या परीक्षा विभागात परीक्षा अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्ह्यानिहाय टेबल लावण्यात आले. परीक्षा अर्ज पडताळणीसाठी स्वतंत्रपणे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. महाविद्यालयातून आलेले परीक्षा अर्ज अचूक आहे अथवा नाही, याच्या पडताळणीसाठी तज्ज्ञांची चमू तैनात करण्यात आली आहे. परीक्षा अर्ज स्वीकारण्यासाठी वेळापत्रक ठरविण्यात आले असून, त्याच कालावधीत टेबलवर ते स्वीकारले जाणार आहेत. यात नियमित विद्यार्थ्यांचे अडीच लाख, तर बॅकलाॅग विद्यार्थ्यांचे ५० हजार परीक्षा अर्ज असणार आहे. सर्वच शाखांच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज असल्याची माहिती आहे. लवकरच परीक्षांचे नियोजन होणार असल्याचे संकेत आहे
परीक्षा शुल्क, विद्यार्थी यादी बंधनकारकटेबलवर ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारचे परीक्षा अर्ज स्वीकारताना महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क भरले वा नाही तसेच विद्यार्थ्यांची यादी बंधनकारक करण्यात आली आहे. विद्यापीठात परीक्षा शु्ल्क अदा केल्याची पावती तपासणी करूनच अर्ज स्वीकारले जात आहेत. यात नियमित, माजी विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जाचा समावेश आहे.
नियमित आणि बॅकलॉग अशा दोन्ही प्रकारचे हिवाळी-२०२० साठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय स्तरावर सादर केलेले परीक्षा अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परीक्षा शुल्काची पावती, विद्यार्थी यादी असल्याशिवाय ते स्वीकारले जात नाही. पुन्हा या परीक्षा अर्जांची छाननी केली जाणार आहे. यात काही त्रुटी आढळल्यास सदर महाविद्यालयांना त्रुटीपत्र दिले जाईल. - हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.