पार्किंगमध्ये झोपण्यासाठी दोन तरुणांनी विचारणा केली; सकाळी मात्र एक फरार आणि एकाचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 19:16 IST2026-02-20T19:13:00+5:302026-02-20T19:16:46+5:30
Amravati : नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा नजीक असलेल्या ट्रक ले-बाय पार्किंगमध्ये एका २५ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना २० फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली.

Two youths asked to sleep in the parking lot; one absconded and the other's body was found in a pool of blood in the morning
तिवसा (अमरावती) : नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा नजीक असलेल्या ट्रक ले-बाय पार्किंगमध्ये एका २५ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना २० फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. विमल अग्रावत (रा. राजकोट, गुजरात) असे मृतकाचे नाव आहे.
नवी भारवाडी येथील रहिवासी जानराव शामरावजी ठाकरे (वय ६०) हे आयआरबीच्या ट्रक पार्किंग स्थळावर चौकीदार म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ते कर्तव्यावर असताना एका रेसर दुचाकीवरून दोन अनोळखी तरुण तिथे आले. आम्हाला इथे थोडा वेळ झोपायचे आहे, असे सांगून ते दोघेही तिथेच मुक्कामी थांबले. सकाळी ७ वाजताच्या सुमारास फिर्यादी ठाकरे जेव्हा उठले, तेव्हा त्या दोन तरुणांपैकी एक जण झोपलेला होता तर दुसरा बाजूला बसून होता. त्यानंतर ठाकरे हे फ्रेश होण्यासाठी घरी गेले.
अर्ध्या तासानंतर, म्हणजेच ७:३० वाजता ते पुन्हा कामावर परतले असता, त्यांना धक्कादायक दृश्य दिसले. तिथे थांबलेल्या दोन तरुणांपैकी एक जण रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला होता, तर त्याचा दुसरा साथीदार तिथून पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. मृतदेहाच्या जवळच रक्ताने माखलेला एक चाकू पोलिसांना मिळून आला आहे. घटनास्थळावर मिळालेल्या बॅगेतील मोबाईल फोन आणि आधार कार्डवरून मृतकाची ओळख विमल अग्रावत (रा. राजकोट, गुजरात) अशी पटवण्यात आली आहे.