२ लाख ३३ हजारांचा दंड, तहसीलदारांचे आदेश
चांदूर रेल्वे : अवैध गौण खनिज वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले. यामध्ये २ लाख ३३ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर आदेश तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी काढले.
प्राप्त माहितीनुसार, चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड (दानापूर) येथे संजय भिकमचंद मुंधडा यांच्या मालकीच्या एमएच २७ एल ४२३५ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक करताना महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले होते. नायब तहसीलदार बी.एन. राठोड यांच्या उपस्थितीत तलाठी एस.वाय. भांगे यांनी पंचनामा केला. यानंतर तहसीलदारांनी यावर १ लाख ५ हजार ७९२ रुपयांचा दंड ठोठावला, तर दुसऱ्या प्रकरणात विष्णू एकनाथ मते यांच्या मालकीच्या एमएच २७ बीव्ही ८५७८ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक करताना ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात चांदूर रेल्वे पोलिसांनी तालुक्यातील भिलटेक येथे पकडले होते. सदर ट्रॅक्टर जप्त करून याचा पंचनामा तलाठी पी. बी. नांदणे यांनी केला. यानंतर सदर ट्रॅक्टरवर १ लाख २७ हजार २६६ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.