खून करून ट्रकसह चणा पळविला, विल्हेवाट न लावता दडविला! वरूड पोलिसांची कारवाई

By प्रदीप भाकरे | Published: August 23, 2023 05:08 PM2023-08-23T17:08:42+5:302023-08-23T17:16:07+5:30

ट्रकचालकाचे खून प्रकरण : ट्रकसह चणाही हस्तगत

truck of chickpea stolen after killing the driver; warud police take action | खून करून ट्रकसह चणा पळविला, विल्हेवाट न लावता दडविला! वरूड पोलिसांची कारवाई

खून करून ट्रकसह चणा पळविला, विल्हेवाट न लावता दडविला! वरूड पोलिसांची कारवाई

googlenewsNext

अमरावती : सहकारी ट्रकचालकाचा खून करून ट्रकसह २५ टन चणा लांबविण्यात आल्याच्या घटनेतील ट्रक व चणा जप्त करण्यात वरूड पोलिसांना यश आले. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी लालू ऊर्फ अखिलेश निसाद (रा. पुसद, जि.वाशिम) याने तो ट्रक पुसद तालुक्यातील धुंदी येथील एस.एन.स्टोन क्रशरचे बाजुला असलेल्या स्वत:च्या गोडाऊनमध्ये दडविल्याची कबुली दिली. त्यानुसार वरूड पोलिसांनी २२ एप्रिल रोजी त्या ट्रकसह गोडावून मध्ये ठेवलेला २५ टन ६० किलो चणा असा माल जप्त करुन ताब्यात घेतला.

तीन दिवसांपुर्वी वरूड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद असलेल्या व नागपुरातील कपिलनगर भागात मिसिंगची नोंद असलेल्या ट्रकचालक शेरू ऊर्फ मेहबुब खान छोटे खान (वय ४५, रा. नागपूर) याचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक उलगडा झाला होता. ठरल्याप्रमाणे लुटीच्या रकमेतील अर्धा हिस्सा देणे लागू नये, यासाठी सहकारी ट्रकचालकानेच त्या ट्रकचालकाची हत्या केली होती. त्यानंतर मृताचा ट्रक व त्यातील १३.७५ लाख रुपयांचा चणा लुटण्यात आला होता.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व वरूड पोलिसांनी मुख्तार बेग हमजा बेग (रा. रिसोड, जि. वाशिम) व लालू ऊर्फ अखिलेश निसाद (रा. पुसद, रा. यवतमाळ) दोन आरोपींना अटक केली होती. फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करताना दोन्ही आरोपींनी शेरूच्या हत्येची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या ट्रकसह चन्याची विल्हेवाट लावल्याचेही त्यांनी सांगितले होते. ८ ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या शेरूचा मृतदेह रविवारी नागपुरातील गिट्टीखदान पोलिसांना आढळला होता. आरोपींनी पीसीआरदरम्यान ट्रक व चणा मालाची विल्हेवाटीबाबत प्रथम पोलिसांची दिशाभूल केली. परंतु पोलिसांनी खाक्या वापरताच आरोपी लालूने चोरलेला ट्रक व चन्याची माहिती दिली.

यांनी केली कार्यवाही

पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव, एसडीपीओ निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात वरूडचे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक धिरज राजुरकर, दिपक वळवी, अंमलदार राजु मडावी, विनोद पवार, सचिन भगत, राजु चव्हाण, प्रफुल्ल लेव्हरकर, आकाश शेंडे, किरण गावंडे, अशोक भुसारी यांनी ही कारवाई केली.

Web Title: truck of chickpea stolen after killing the driver; warud police take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.