मुलाच्या त्रासाला कंटाळून जन्मदात्यानेच उपसले शस्त्र; बालाजीनगर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 19:28 IST2026-02-13T19:14:37+5:302026-02-13T19:28:07+5:30
Amravati : सततच्या त्रासाला कंटाळून एका ७६ वर्षीय पित्याने आपल्या पोटच्या मुलावर चाकूने सपासप वार केले. ही धक्कादायक घटना ११ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास येथील कठोरा नाका भागातील बालाजीनगर येथे घडली.

Tired of the child's suffering, the father himself killed his son; Incident in Balajinagar
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सततच्या त्रासाला कंटाळून एका ७६ वर्षीय पित्याने आपल्या पोटच्या मुलावर चाकूने सपासप वार केले. ही धक्कादायक घटना ११ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास येथील कठोरा नाका भागातील बालाजीनगर येथे घडली. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भावाला पाहून मोठ्या भावाने पोलिसांत धाव घेतली आहे. या प्रकरणी पित्याविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालाजीनगर येथील रहिवासी फिर्यादी आशिष अरविंद मानेकर हे वाचनालय चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा भाऊ सचिन याला दारूचे व्यसन असून, त्याच्या मानसिक स्थितीवरही याचा परिणाम झाला आहे. सचिनच्या या त्रासामुळे त्याला नागपूर येथील व्यसनमुक्ती केंद्रातही ठेवण्यात आले होते. तरीही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपासूनच सचिनने दारू पिऊन घरात राडा सुरू केला होता. तो वडील अरविंद मानेकर यांच्याकडे पैशांची मागणी करत त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रयत्न करत होता.
रात्री ८.३० ला कृत्य, वडिलांवर गुन्हा दाखल
दिवसभर चाललेला हा वाद रात्री ८.३० च्या सुमारास विकोपाला गेला. रागावरचे नियंत्रण सुटल्याने वडील अरविंद मानेकर यांनी घरातील चाकूने सचिनवर वार केले. रात्री ९ वाजता आशिष मानेकर घरी परतले असता, त्यांना अंगणात रक्ताचे डाग आणि पोलीस दिसले. आई कुसुमबाई यांनी रडत घडलेला सर्व प्रकार सांगितला. शेजारी रोशन आवारे यांच्या मदतीने जखमी सचिनला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी तक्रारदार आशिष मानेकर यांच्या जबाबावरून आरोपी वडील अरविंद मानेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.