पायाळू सुनेला नेत होते जंगलात.. गुप्तधनाच्या लालसेने करायचे अमानुष छळ ; विवाहितेने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 13:55 IST2025-11-21T13:50:45+5:302025-11-21T13:55:08+5:30
विवाहितेची आत्महत्या : पतीसह चौघांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा

They used to take daughter-in-law to the forest.. He tortured her inhumanly for the greed of hidden wealth; The married woman committed suicide
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : काही महिन्यांपूर्वी लग्न करून सासरी आलेल्या एका नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सासरकडून सुरू असलेल्या अनन्वित छळाला, संशयास्पद दबावाला आणि अंधश्रद्धेला कंटाळून तिने आयुष्य संपवले. आशिया शेख मजहर शेख (२०) असे या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी दत्तापूर पोलिसांनी बुधवारी (१९ नोव्हेंबर) तिचा पती शेख मजहर शेख अकबर (२४), सासरा शेख अकबर शेख अहमद व एक महिला (सर्व रा. जुना धामणगाव) यांच्याविरुद्ध हुंडाबळीसह तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. सासरची मंडळी आशियाला ती पायाळू असल्याने गुप्तधन शोधण्यासाठी जंगलात नेत होते, असा धक्कादायक प्रकारदेखील उघड झाला आहे.
फिर्यादी शेख हारूण शेख सुलेमान (रा. मंगरूळ दस्तगीर) यांची मुलगी आशिया हिचा मे २०२५ मध्ये मजहर शेख याच्याशी निकाह झाला. निकाहनंतर काही दिवसांनी फिर्यादी कुटुंबीयांसह मुलीला भेटायला गेले असता आशियाने रडत सासरी होणाऱ्या छळाची माहिती दिली. पती, सासू-सासरे मला मोबाइलवर बोलू देत नाहीत. गुलामासारखे वागवतात आणि घरातील सर्व कामे माझ्याच माथी मारतात, असे तिने पालकांना सांगितले.
यानंतर काही दिवसांनी झालेल्या दुसऱ्या भेटीत तर तिने अधिक धक्कादायक माहिती दिली. मी पायाळू असल्याच्या कारणावरून पती आणि सासरे मला रात्री गुप्तधन काढण्यासाठी जंगलात घेऊन जातात, असा खुलासा तिने वडिलासमोर केला. त्यामुळे मी माझ्या मुलीला घ्यायला येतो, अस फोन शेख हारून यांनी मुलीच्या सासऱ्याला केला. मात्र त्यावर तुम्ही येऊ नका, मीच आणून सोडतो, असे शेख अकबर याने बजावले. मात्र, सुनेस त्याने माहेरी आणून सोडले नाही.
आईजवळही रडली होती आशिया
आपण मुलीला भेटायला गेलो तेव्हा तिने सासरी चालणाऱ्या त्रासाबद्दल आपल्याशी बोलल्याचे आशियाच्या आईने सांगितले. सासरचे लोक मला त्यांच्या सांगण्याप्रमाणे सर्व कामे करायला लावतात. तसे न केल्यास तुझ्या घरून पाच लाख रुपये घेऊन ये असा दम भरतात, असे आशियाने सांगितल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या सर्व छळामुळेच मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले, असा आरोप करत पती, सासरा आणि सासूविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी शेख हारूण यांनी पोलिसांकडे केली आहे.
अशी घडली होती घटना
दरम्यान कौटुंबिक, शारिरिक, मानसिक व आर्थिक छळाला कंटाळून आशिया हिने २२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० ते ११:३० या कालावधीत जुना धामणगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याप्रकरणी, दत्तापूर पोलिसांनी त्याचदिवशी दुपारी २:०२ च्या सुमारास आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर त्या मर्गचा तपास करण्यात आला. बयाण नोंदविण्यात आले.