लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पतीच्या निधनानंतर आधार देण्याऐवजी, पोटातील गर्भाला संपविण्यासाठी विधवा सुनेवर अमानवीय दबाव टाकल्याची धक्कादायक घटना येथे समोर आली आहे. यात नांदगाव पेठ पोलिसांनी रविवारी सासू-सासऱ्यासह पाच जणांविरुद्ध संगनमत करून सुनेला शारीरिक व मानसिक त्रास देत गर्भपातासाठी धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
एफआयआरनुसार, फिर्यादी महिला स्नेहा (वय २६) यांचा विवाह मोठी उमरी येथील गजानन यांच्याशी झाला होता. काही काळापूर्वी आजारपणामुळे गजानन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फिर्यादीला आधीच एक मुलगी असून पतीच्या निधनावेळी त्या पुन्हा गर्भवती होत्या. पतीच्या निधनानंतर सासरच्या मंडळींनी मदतीचा हात देण्याऐवजी सुनेला छळण्यास सुरुवात केली. सासरच्या मंडळींनी फिर्यादीला 'तुझा गर्भपात कर', असे म्हणून सतत मानसिक त्रास दिला. इतकेच नव्हे तर, जर तू स्वतःहून गर्भपात केला नाहीस, तर ओळखीच्या डॉक्टरांकडून तुझा गर्भपात करून टाकू, अन्यथा तू गोळ्या खाऊन मरून जा, अशा टोकाच्या धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या सततच्या त्रासामुळे व शिवीगाळीमुळे पीडित महिलेने अखेर पोलिसांत धाव घेतली. तक्रारीवरून पोलिसांनी पीडित महिलेच्या सासू, सासरे, दोन नणंद भासयऱ्यांविरुद्ध कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला. अमरावती शहर महिला सेलकडे प्राप्त झालेल्या अर्जाच्या चौकशीदरम्यान समेट घडून आला नाही. नंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वात अंमलदार सतीश भोंगाडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Web Summary : Amravati: Widow harassed, pressured for abortion by in-laws after husband's death. Police filed case against five for physical and mental abuse. The victim was threatened to abort or die.
Web Summary : अमरावती: पति की मौत के बाद ससुराल वालों द्वारा विधवा को गर्भपात के लिए प्रताड़ित और मजबूर किया गया। पुलिस ने शारीरिक और मानसिक शोषण के लिए पांच के खिलाफ मामला दर्ज किया। पीड़िता को गर्भपात या मरने की धमकी दी गई।