संप सुरूच; कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे थाली बजाओ आंदोलन

By उज्वल भालेकर | Published: November 16, 2023 06:27 PM2023-11-16T18:27:30+5:302023-11-16T18:29:11+5:30

भाऊबीजनिमित्त महिला कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना घातली ओवाळणी

The strike continues; Thali Bajao Andolan of Contractual Health Workers | संप सुरूच; कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे थाली बजाओ आंदोलन

संप सुरूच; कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे थाली बजाओ आंदोलन

अमरावती : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संप २३ व्या दिवशीही सुरूच असून, झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी गुरुवारी कर्मचाऱ्यांनी थाली बजाओ आंदोलन केले. त्याचबरोबर महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागातील अधिकारी यांना भाऊबीजनिमित्त ओवाळणी घालून शासकीय सेवेत समायोजनासंदर्भातील मागणी ही शासनापर्यंत पोहोचविण्याची विनंतीदेखील केली.

दिवाळीचा सण हा प्रत्येकासाठी आनंद घेऊन येणारा तसेच अंधकारमय जीवनामध्ये प्रकाशाचे दिवे लावणारा सण म्हणून ओळखला जातो. परंतु कंत्राटी आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी ही काळी दिवाळी ठरल्याचे संपातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. २५ ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनाची राज्य शासनाने दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे नियमित होणारे लसीकरण हे पूर्णत: बंद आहे. उपकेंद्र बंद पडले असून, सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. केंद्र शासनाची आयुष्यमान भव मोहीम पूर्णतः बंद आहे.

राज्य शासनाचे एनएटीव्हीएम कार्यक्रम पूर्णपणे बंद आहे. नियमित लसीकरण सत्र बंद आहेत. सर्व ऑनलाइन पोर्टल जसे ई-संजीवनी, एच.डब्ल्यू.सी, एन.सी.डी. बंद पडले आहेत. एनआरसी पूर्णतः बंद पडली आहे. परंतु अजूनही संपाची दखल न घेतल्याने अखेर झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संप मंडपातच थाली बजाओ आंदोलन करत राज्य शासनाचा निषेध नोंदविला. तसेच भाऊबीजचे औचित्य साधून कंत्राटी महिला कर्मचारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना ओवाळणी घातली. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांची समायोजनासंदर्भातील मागणीचा पाठपुरावा करण्याची मागणीदेखील यावेळी केली.

Web Title: The strike continues; Thali Bajao Andolan of Contractual Health Workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.