आरोग्य केंद्रात फार्मासिस्ट नाही; औषधी देणार कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 13:01 IST2024-05-02T13:00:26+5:302024-05-02T13:01:55+5:30
Amravati : २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील पदे रिक्त; पदभरती रखडली

Lack of pharmacists in Amravati
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरविण्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची भूमिका ही महत्त्वाची आहे; परंतु जिल्ह्यातील २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत औषधपुरवठा व वितरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फार्मासिस्टची २८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना औषधी मिळण्यासाठी अडचणी येत असल्याचे दिसून आले. काही आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांचीही पदे रिक्त असल्याची प्राथमिक माहिती आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्रे ही महत्त्वाची आहेत. त्यामुळे किरकोळ आजारावर रुग्णांना तातडीने गावातच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात ही आरोग्य केंद्रे महत्त्वाची ठरत आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात एकूण ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत; परंतु यातील २८ आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांना औषध देणाऱ्या फार्मासिस्टचे पद रिक्तच आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना औषधी उपलब्ध होत नसून, त्यांना इतर शासकीय रुग्णालयात औषधीसाठी यावे लागत आहे.
संबंधित आरोग्य केंद्रात कोणकोणती औषधी उपलब्ध आहेत, कोणत्या औषधी कमी आहेत, याची मागणीदेखील जिल्हा परिषदेच्या औषधी भांडार विभागाकडे उपलब्ध होत नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णांच्या सोयीसाठी तसेच प्रत्येक रुग्णास आवश्यक औषधी उपलब्ध करण्यासाठी रिक्त फार्मासिस्टची पदे भरण्याची मागणी होत आहे.
उपचार होतात; मात्र औषधी नाही
प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक उपचार सुविधा मिळते; परंतु आरोग्य केंद्रात फार्मासिस्ट नसल्याने डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधी मिळत नाही. काही ठिकाणी औषधी उपलब्ध नसल्याचे उत्तर रुग्णांना दिले जाते, तर जेथे फार्मासिस्टचे पद रिक्त आहे, त्याठिकाणी इतर आरोग्य केंद्रांतील फार्मासिस्टवर अतिरिक्त जबाबदारी दिली आहे. परंतु, एकाच वेळी दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांत सेवा कशी देणार, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.
पदभरती अडकली
राज्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांतील फार्मासिस्टच्या रिक्त पदांसाठी पदभरती राबविण्यात आली आहे. त्यासंदर्भातील परीक्षादेखील घेण्यात आली; परंतु आचारसंहितेमुळे पुढील निवड प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने पदभरतीमधील निवड प्रक्रिया पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.