आमदार संतोष बांगर यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणातील आरोपींची कारागृहात रवानगी
By गणेश वासनिक | Updated: September 27, 2022 18:32 IST2022-09-27T18:25:02+5:302022-09-27T18:32:30+5:30
या घटनेने एकच खळबळ उडाली होती

आमदार संतोष बांगर यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणातील आरोपींची कारागृहात रवानगी
अंजनगाव सुर्जी (अमरावती) : अंजनगाव सुर्जी येथील श्री देवनाथ मठात हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे तसेच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे तीन दिवसांपूर्वी मठाधिपती जितेंद्र नाथ महाराज यांच्या दर्शनाकरिता मठात होते. दर्शन करून मठातून निघताच लाला चौक येथे उपस्थित असणाऱ्या १५ ते २० शिवसैनिकांनी त्यांच्या वाहनावर अचानक हल्ला चढविला. शिवसेना जिंदाबाद, पन्नास खोके एकदम ओके, संतोष बांगर गद्दार है अशा घोषणा देत शिवसैनिकांनी आ. संतोष बांगर यांना शिवीगाळ करून त्यांच्या वाहनावर थापा मारल्या व जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे अंजनगाव सुर्जी शहरात खळबळ उडाली होती. यावेळी त्यांच्यासोबत बांगर यांच्या कुटुंबातील सदस्य वाहनात उपस्थित होते.
याप्रकरणातील आरोपी राजेंद्र अकोटकर, अभिजित भावे, महेंद्र दिपट्टे, गजानन विजेकर, गजानन चौधरी, रविंद्र नाथे, गजानन हाडोळे, मयूर रॉय, शरद फिसके, रवींद्र नाथे, गजानन पाठे, विनोद पायघन, अंकुश गुजर, प्रवीण नेमाडे, अंकुश दातीर यांच्यावर भांदवी ३५३, ३०७, १४३, १४७, १४९, ४४१ या कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. सोमवारी सर्व आरोपींना कोर्टात हजर केले असता सर्वांना एक दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. तर मंगळवारी आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून, आरोपींची अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली आहे.