दहा रुपये पाठविले अन् १.१९ लाखाला चुना !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 13:29 IST2024-05-11T13:28:40+5:302024-05-11T13:29:08+5:30
Amravati : खात्यातून तब्बल १ लाख १८ हजार ९९८ रुपये परस्पर विड्रॉल

Ten rupees sent and 1.19 lakhs debited automatically!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : टोकन नंबर मिळविण्यासाठी १० रुपये ऑनलाईन पाठविताच एका खेडुताच्या खात्यातून तब्बल १ लाख १८ हजार ९९८ रुपये परस्पर विड्रॉल करण्यात आले. २१ एप्रिल रोजी सकाळी ८ च्या सुमारास अचलपूर तालुक्यातील गोंडवाघोली येथे ही घटना घडली. याप्रकरणी पथ्रोट पोलिस ठाण्यात राजेंद्र कारले (३३) यांच्या तक्रारीवरून ९ मे रोजी दुपारी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी राजेंद्र कारले यांना स्वतःच्या मुलाला अमरावती येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत मुरके यांना दाखवायचे होते. त्यांना येथे येऊन नोंदणी करणे शक्य नसल्याने त्यांनी गुगल सर्चवरून हॉस्पिटलशी संबंधित मोबाईल क्रमांक घेऊन त्यावर संपर्क केला. त्यानंतर त्यावर त्यांना व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठविण्यात आली.
लिंकवर माहिती भरून टोकन नंबर मिळण्याकरिता फोन पेने १० रुपये पाठविण्यास सांगितले. त्यामुळे कारले यांनी दोन मोबाईल क्रमांकावर दहा रुपये फोन पेद्वारे पाठविले. त्याचवेळी त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून १९ हजार रुपये व सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून ९९ हजार ९९८ रुपये परस्पर काढण्यात आले. ऑनलाईन फसवणुकीची जाणीव होताच राजेंद्र कारले यांनी पथ्रोट पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी ९ मे रोजी दुपारी गुन्ह्याची नोंद केली. प्रकरणाचा तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात होत आहे.