परतवाड्यात दहा बेडचे कोविड रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:00:51+5:30

संशयित रुग्णांच्या राखीव पाच बेडसह अन्य पाच बेडकरिता व्हेंटिलेटरची व्यवस्था प्रस्तावित आहेत. यात उपजिल्हा रुग्णालयातील दोन व्हेंटिलेटर वापरले जाणार आहेत. उर्वरित दोन व्हेंटिलेटर राज्यमंत्री बच्चू कडू, तर दोन व्हेंटिलेटर रोटरी क्लबकडून उपलब्ध करून दिले जात आहेत. गरज भासल्यास शहरातील खासगी रुग्णालयातील व्हेंटिलेटरचा उपयोग येथे केला जाणार आहे.

Ten-bed Covid Hospital in Paratwada | परतवाड्यात दहा बेडचे कोविड रुग्णालय

परतवाड्यात दहा बेडचे कोविड रुग्णालय

ठळक मुद्देप्रशासन सज्ज : व्हेंटिलेटरची जुळवाजुळव; ट्रामा केअर युनिटमध्ये पाच बेडचा आयसीयू

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : स्थानिक कॉटेज हॉस्पिटल परिसरातील ट्रामा केअर युनिटच्या इमारतीत दहा बेडचे कोविड रुग्णालय बनविले जात आहे. यात ट्रामा केअर युनिटच्या इमारतीत पाच-पाच बेडचे स्वतंत्र कक्ष निर्माण केले गेले. यातील पाच बेड कोरोना संशयित रुग्णांकरिता राखीव ठेवण्यात आले, तर पाच अतिरिक्त बेड आपत्कालीन स्थितीत उपचाराकरिता सज्ज आहेत.
संशयित रुग्णांच्या राखीव पाच बेडसह अन्य पाच बेडकरिता व्हेंटिलेटरची व्यवस्था प्रस्तावित आहेत. यात उपजिल्हा रुग्णालयातील दोन व्हेंटिलेटर वापरले जाणार आहेत. उर्वरित दोन व्हेंटिलेटर राज्यमंत्री बच्चू कडू, तर दोन व्हेंटिलेटर रोटरी क्लबकडून उपलब्ध करून दिले जात आहेत. गरज भासल्यास शहरातील खासगी रुग्णालयातील व्हेंटिलेटरचा उपयोग येथे केला जाणार आहे.
यापूर्वी उपजिल्हा रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता रुग्णालयात संशयित रुग्णांकरिता सेंट्रलाइज्ड ऑक्सीजनचा वापर करीत स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. पण, कोविड-१९ अंतर्गत अशी व्यवस्था स्वतंत्र इमारतीत आवश्यक असून, ती इमारत आयसोलेटेड असणे गरजेचे आहे. यामुळे कोविड रुग्णालयाकरिता ट्रामा केअर युनिटची इमारत घेण्यात आली आहे. या कोविड रुग्णालयात पाच बेडचा आयसीयू राहणार आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनात अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. सरवत वर्मा या नव्याने उभारल्या जात असलेल्या कोविड रुग्णालयाच्या कामकाजावर लक्ष ठेवून आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, उपविभागीय अभियंता विजय वाट व आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार शाखा अभियंता एस.आर. बोडखे आवश्यक ते बदल इमारतीत युद्धपातळीवर करीत आहेत.

पीपीई किटची आवश्यकता
उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर व सिस्टरकरिता पीपीई किट आवश्यक आहेत. केवळ मास्क आणि हँडग्लोव्ह्ज तेवढे पुरविण्यात आले; किटअभावी डॉक्टर, सिस्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे.

Web Title: Ten-bed Covid Hospital in Paratwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.