चिखलदरा (अमरावती) : संपूर्ण राज्याला हादरून सोडणाऱ्या मेळघाटातील रेट्याखेडा येथील वृद्ध महिलेवर अमानवीय अत्याचार आणि धिंड काढल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई येथे भेट घेतली. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी पत्र दिले. गुन्हेगार व त्यांना पाठीशी घालणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात ठाणेदार व जमादारावर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.
मेळघाट विधानसभा मतदारसंघातील चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा येथील काळमी नंदराम शेलूकर (वय ७७) या आदिवासी वृद्धेला पोलिस पाटील व अन्य नागरिकांनी जादूटोण्याचा आळ घेत तिला दोरखंडाने बांधून मारले. तिला गरम साखळीचे चटके, मिरचीची धुरी दिली व तोंडाला काळे फासले. डोक्यावर गाठोडे देऊन मारहाण करीत गावातून बेदखल केले.
पालकमंत्र्यांकडून गंभीर दाखल मेळघाटातील या प्रकरणाला 'लोकमत'ने वाचा फोडली. तत्पूर्वी, घटनेनंतर याची माहिती आमदार केवलराम काळे यांना मिळताच त्यांनी संबंधित ठाणेदार व जमादाराला फोनवर गंभीर प्रकरण सांगत तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाईचे आदेश दिले. परंतु, त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले. या बाबीची पालकमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे.
ठाणेदारावर मेहरबान कोण? फिर्यादीने सांगितले नसल्याचे अगोदर पोलिसांनी वरिष्ठांना कळविले. परंतु, ५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष आ. केवलराम काळे यांनी फोनवर सांगूनही १८ दिवस चौकशी केली गेली नाही. लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली. त्यानंतर गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली.