अभ्यासक्रम नवा, पेपर जुना; एम.एस्सीच्या विद्यार्थ्यांची उडाली तारांबळ

By गणेश वासनिक | Published: February 6, 2023 08:29 PM2023-02-06T20:29:43+5:302023-02-06T20:29:49+5:30

अमरावती विद्यापीठात नेमकं चाललंय काय?, सीबीसीएस नव्या पॅटर्नच्या अभ्यासक्रमानुसार परीक्षांची तयारी

Syllabus new, paper old in Amravati university; The students of M.Sc got confused | अभ्यासक्रम नवा, पेपर जुना; एम.एस्सीच्या विद्यार्थ्यांची उडाली तारांबळ

अभ्यासक्रम नवा, पेपर जुना; एम.एस्सीच्या विद्यार्थ्यांची उडाली तारांबळ

googlenewsNext

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठअंतर्गत महाविद्यालयीन केंद्रावर चाईस्ड बेस्ड क्रेडिट सिस्टिम (सीबीसीएस) या नवीन प्रणालीनुसार एम.एस्सी भाग १ च्या सेमिस्टर परीक्षेत सोमवार, ६ फेब्रुवारी रोजी जुन्याच अभ्यासक्रमाचे पेपर देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली असून, अनेकांनी केंद्राधिकाऱ्यांकडे तक्रारदेखील केली आहे. मात्र, एम.एस्सीच्या परीक्षा रद्द न करता जुन्याच अभ्यासक्रमानुसार घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे अमरावती विद्यापीठाचा कारभार कसा सुरू आहे, हे स्पष्ट होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी गत दोन दिवसांपूर्वीच अमरावती विद्यापीठाचा कुलगुरूपदाचा प्रभार स्वीकारला आहे. तोच सोमवारी एम.एस्सी परीक्षांमध्ये गोंधळ उडाला आहे. अमरावती विभाग पदवीधर निवडणूक आणि कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे विद्यापीठाला ३ व ४ फेब्रुवारी रोजीचे पेपर रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तथापि, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १२ वाजता दरम्यान नियोजित वेळापत्रकानुसार सीबीसीएस एम. एस्सी भाग १ सेमिस्टर पॅटर्नच्या विद्यार्थ्यांची पेपर रद्द करण्याची मागणी दुर्लक्षित करण्यात आली. हिवाळी २०२२ सीबीसीएस पॅटर्नच्या परीक्षेत अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशिम या पाचही जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर एम.एस्सीच्या विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

एम.एस्सी-भाग १ इलेक्ट्रॉनिक्स सेमिस्टर १ च्या सोमवारी ‘फंडामेंटल्स ऑफ सेमिकंडक्टर डिव्हाईस’ या विषयाची प्रश्नपत्रिका सीबीसीएस पॅटर्ननुसार न मिळता जुन्याच अभ्यासक्रमानुसार मिळाली. त्यामुळे प्रश्नपत्रिका सोडविताना अडचणी आल्यात. परीक्षा नियंत्रकांनी योग्य ती कार्यवाही करून न्याय द्यावा, यासाठी सोमवारी केंद्राधिकाऱ्यांना पत्रसुद्धा दिले आहे. - तेजस हरमकर, परीक्षार्थी एम.एस्सी. ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय.

Web Title: Syllabus new, paper old in Amravati university; The students of M.Sc got confused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.