पती पोलीस प्रशिक्षणाकरिता वाशिमला अन् घरात गळफास लावून पत्नीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 16:04 IST2022-03-11T15:43:25+5:302022-03-11T16:04:21+5:30
शुक्रवारी सकाळी ७ वाजता मुले झोपेतून उठली असता, त्यांना आई पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली.

पती पोलीस प्रशिक्षणाकरिता वाशिमला अन् घरात गळफास लावून पत्नीची आत्महत्या
वरूड (अमरावती) : बेनोडा (शहीद) पोलीस ठाण्यात कार्यरत उपनिरीक्षक गणपत पुपुलवार यांच्या ३२ वर्षीय पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली. पती दोन दिवसांच्या पोलीस प्रशिक्षणाकरिता वाशिमला गेल्याने घरी केवळ लहान मुलांसह पत्नीच होती.
पोलीस सूत्रांनुसार, गंगा गणपत पुपुलवार (३२, ह.मु. साईसंगम कॉलनी, वरूड) असे मृताचे नाव आहे. पती गणपत पुपुलवार हे बेनोडा पोलीस ठाण्यात उपनिरीक्षकपदावर कार्यरत आहेत. ते दोन दिवसांच्या प्रशिक्षणाकरिता वाशिमला गेले होते. घरी केवळ गंगा यांच्यासह आठ वर्षीय गौरव आणि चार वर्षीय गौरी ही मुले असे तिघेच होते. शुक्रवारी सकाळी ७ वाजता मुले झोपेतून उठली असता, आईने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळल्यावर त्यांच्या शेजारच्यांना बोलावले आणि एकच हंबरडा फोडला. या घटनेमुळे साईसंगम कॉलनीत खळबळ उडाली आहे.
आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसून, वरूडचे ठाणेदार प्रदीप चौगावकरसह पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता ठेवला आहे. नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे ठाणेदार प्रदीप चौगावकर यांनी सांगितले. या घटनेबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक सारिका बागडेसह वरूड पोलीस पुढील तपास करीत आहे .