व्याघ्र प्रकल्पात भटक्या कुत्र्यांचा वावर, वन्यजीव संरक्षणाला अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:02 IST2025-11-04T17:59:40+5:302025-11-04T18:02:50+5:30
गाव-खेड्यातील कुत्र्यांचा वाढला त्रास : वनसीमेवरील कचरा संकलन केंद्र, टाकाऊ पदार्थ ठरतेय धोकादायक

Stray dogs in tiger reserve hinder wildlife conservation
अमरावती : विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. एकीकडे वाघांची संख्या वाढत असताना भटक्या कुत्र्यांमुळे वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धनास अडथळा येत आहे. यासंदर्भात व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्र संचालकांनी ही गंभीर बाब वरिष्ठांना कळविली असून, लगतच्या गावातून व्याघ्र प्रकल्पात ही भटकी कुत्रे ये-जा करतात. किंबहुना अनेकदा या भटक्या कुत्र्यांची शिकार वन्यप्राणी करत असल्यामुळे त्यांना विविध आजार जडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ताडोबा-अंधारी, मेळघाट, पेंच, बोर, टिपेश्वर, उमरेड-कऱ्हांडला आणि नवेगाव-नागझिरा या प्रकल्पांमुळे विदर्भातील वाघांची संख्या ५००च्या वर गेलेली आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प हाऊसफुल्ल झाले असून, येथील वाघ नजीकच्या जिल्ह्यांमध्ये भ्रमंती करीत असल्याचे वास्तव आहे. परंतु, व्याघ्र प्रकल्पानजीकच्या गावांमधून भटकी कुत्री व्याघ्र प्रकल्पात शिरत असल्याने वाघ, बिबटसह अन्य वन्यजीवांचे संवर्धन, संरक्षणाची नवी समस्या उभी ठाकली आहे. भटक्या कुत्र्यांबाबत कायमस्वरूपी तोडगा कसा काढावा, यासंदर्भात राज्याचा वन्यजीव विभाग उपाययोजना करीत असल्याची माहिती आहे. याकरिता पशुसंवर्धन विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, वन्यजीव एनजीओ यांची मदत घेतली जात आहे.
वनसीमेवरील गावांवर लक्ष
भटक्या कुत्र्यांचा हैदाेस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी वनसीमेवरील गावांवर लक्ष केंद्रित केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रमुखांशी पत्रव्यवहार करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, असे याद्वारे कळविण्यात आल्याची माहिती आहे.
तर वाघ, बिबट्यांना संसर्गजन्य आजार होऊ शकतो
वाघांचे अधिवास ठरले आहे. त्यामुळे ताे निश्चित परिसरात वावरतो. वाघ कुत्र्याची शिकार करीत नाही. त्याच्या शिकारीचे खाद्य ठरले आहे. किंबहुना वाघ बाहेर पडला आणि त्याने भटक्या कुत्र्याची शिकार केल्यास वाघालादेखील कॅनाईन, रेबीज यासारखे संसर्गजन्य आजार होऊ शकतात. बिबट्याने संसर्गजन्य कुत्र्याची शिकार केल्यास त्याला गंभीर संसर्गाच्या सामोरे जावे लागेल, अशी माहिती अमरावती महापालिकेतील पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे यांनी दिली.
"व्याघ्र प्रकल्प अथवा बाहेर वाघाने भटक्या कुत्र्याची शिकार केली असेल, असे काही उदाहरण निदर्शनास आले नाही. मात्र, बिबट कुत्र्याची शिकार करतो, ही त्याची सवय आहे. शहरालगतच्या भागात बिबट्याचे वास्तव वाढले आहे; परंतु व्याघ्र प्रकल्पात भटक्या कुत्र्याची ये-जा असल्याचे लक्षात येताच त्यावर ठोस उपाययोजना केल्या जातील."
- एम. एस. रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव) महाराष्ट्र