राज्यातील जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक
By Admin | Updated: July 5, 2017 15:48 IST2017-07-05T15:48:39+5:302017-07-05T15:48:39+5:30
मान्सूनच्या प्रतीक्षेत महिना उलटत असताना धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस न पडल्याने प्रकल्पातील जलाशयांची स्थिती चिंताजनक झाली आहे.

राज्यातील जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक
आॅनलाईन लोकमत
अमरावती : मान्सूनच्या प्रतीक्षेत महिना उलटत असताना धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस न पडल्याने प्रकल्पातील जलाशयांची स्थिती चिंताजनक झाली आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील उपयुक्त साठ्याची तुलनात्मक स्थिती पाहता नागपूर प्रदेशातील ३८४ प्रकल्पांमध्ये ४ जुलैअखेर केवळ १०.१० टक्के उपयुक्त जलसाठा असल्याने या विभागावर अद्यापही पाणीटंचाईची टांगती तलवार आहे.
जलसंपदा विभागानुसार राज्यातील एकूण ३२४९ पाटबंधारे प्रकल्पात ४ जुलैअखेर केवळ २२.६२ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. ४ जुलै २०१६ रोजी केवळ १०.९६ टक्के जलसाठा शिल्लक होता. गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात ११ टक्क्यांची वाढ झाली असली तरी ती शेती आणि सिंचनासाठी पुरेशी नाही. राज्यातील एकूण १३८ मोठ्या प्रकल्पांमध्ये २२.४१ टक्के साठा आहे. गतवर्षी तो १०.२३ टक्के असा होता. २५६ मध्यम प्रकल्पांमध्ये गतवर्षी १८.७० टक्के जलसाठ्याची नोंद होती. यंदा त्यात ८ टक्क्यांनी वाढ झाली असून हा जलसाठा २६.५४ टक्क्यांवर स्थिरावला आहे. राज्यात एकूण २८५५ लघुप्रकल्प असून त्याची प्रकल्पीय जलक्षमता ६८८७ दलघमी आहे. ४ जुलैअखेर याप्रकल्पांमध्ये २०.२३ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी ४ जुलैला याप्रकल्पात केवळ ७.७१ टक्के जलसाठा होता.