विद्यापीठात दुष्काळ शुल्कमाफी प्रक्रियेला वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 18:05 IST2018-12-11T18:05:22+5:302018-12-11T18:05:46+5:30
प्रवेशित विद्यार्थ्यांच्या यादीची चाचपणी : परीक्षा विभागाकडून प्राचार्यांना पत्र

विद्यापीठात दुष्काळ शुल्कमाफी प्रक्रियेला वेग
अमरावती : राज्यात उद्भवलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शासनाने दुष्काळग्रस्त भागासाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्याअनुषंगाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कदेखील माफ करण्याचे धोरण लागू केले आहे. उच्च व शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफी देण्यासंदर्भात कार्यवाही आरंभली आहे. प्राचार्यांना पत्र पाठवून दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत कळविले आहे.
२३ आॅक्टोबर २०१८ रोजी शासनाने खरीप हंगामातील ट्रीगर- २ लागू झालेल्या १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून काही सवलती लागू केल्या आहेत. यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी ही सवलत समाविष्ट केली आहे. यात विद्यापीठे, तंत्रशिक्षण मंडळ आदींमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीची सवलत मिळणार आहे. त्यानुसार अमरावती विद्यापीठाने महसूल व वनविभागाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी देण्याकरिता युद्धस्तरावर कार्यवाही चालविली आहे. किंबुहना शासन निर्णयापूर्वी परीक्षा शुल्क आकारले असल्यास ती रक्कम परत करण्यासाठीची कार्यवाही महाविद्यालयांना करावी लागणार आहे. अमरावती विद्यापीठाने तालुकानिहाय महाविद्यालयांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीदेणेबाबत अवगत केले आहे. परीक्षा शुल्कमाफीचा लाभ किती विद्यार्थ्यांनी घेतला, ही आकडेवारी महाविद्यालयातून मागविली जाणार आहे. अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांत पाच लाखांचावर प्रवेशित विद्यार्थीसंख्या असून, दुष्काळसदृश तालुक्यांना याचा लाभ मिळेल, हे विशेष.
२८ तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांत जाहीर झालेल्या २८ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळणार आहे. यात अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चिखलदरा, मोर्शी, वरूड व अंजनगाव सूर्जी, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, मोताळा व सिंदखेड राजा, अकोला जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर, तेल्हारा, यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव, दारव्हा, कळंब, केळापूर, महागाव, मारेगाव, राळेगाव, उमरखेड व यवतमाळ तर वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यांचा समावेश आहे.
उच्च व शिक्षण सहसंचालकांकडून प्राप्त पत्रांचा आधार घेत दुष्काळग्रस्त भागातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहे. प्राचार्यांना तशा सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या असून, खरीप हंगामातील दुष्काळसदृश तालुक्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
- हेमंत देशमुख,
संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग