...अन् आईने फोडला हंबरडा; खेळताना पाळण्याच्या दोरीचा फास लागल्याने लेकीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 20:26 IST2021-02-18T20:25:13+5:302021-02-18T20:26:08+5:30
Accidental Death : दर्यापुरातील घटना, बिजवे कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

...अन् आईने फोडला हंबरडा; खेळताना पाळण्याच्या दोरीचा फास लागल्याने लेकीचा मृत्यू
दर्यापूर (अमरावती) - घरातील पाळण्याच्या दोरीचा फास लागून ११ वर्षीय मुलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना येथील आठवडी बाजार परिसरात बुधवारी रात्री १० च्या सुमारास घडली. मुग्धा आशिष बिजवे (११) असे मृत मुलीचे नाव आहे.
येथील आठवडी बाजारातील रहिवासी व किराणा व्यावसायी आशिष बिजवे यांची मुलगी मुग्धा ही बुधवारी रात्री घराच्या वरच्या माळ्यावर अभ्यासासाठी गेली होती. तेथील पाळण्यावर बसून झोका घेताना अचानक तिच्या गळ्याला पाळण्याची दोरी आवळली गेली. फास लागल्याने तिचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही मुलगी खाली आली नसल्याने मुग्धाच्या आजीने वर जाऊन बघितल्यावर ही घटना उघडकीस आली. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली.
कुटुंबीयांनी तात्काळ तिला रुग्णालयात नेले. मात्र, तोवर तिचा मृत्यू झाला होता. मुग्धा ही पाचव्या वर्गात शिकणारी अत्यंत हुशार व परिसरात सर्वांची लाडकी होती. घटनेदरम्यान मुग्धाची आई आणि लहान बहीण बाहेरगावी गेले होते. मुग्धाला आवडणारी भाजी आणण्यासाठी तिचे वडील हॉटेलमध्ये गेले होते. परत आल्यानंतर त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. सदर घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
अन् आईने फोडला हंबरडा
ही घटना कळताच मुग्धाची आई वैशाली बिजवे यांनी तातडीने घर गाठले. गतप्राण झालेली लाडकी मुलगी बघून त्यांनी हंबरडा फोडला. गुरुवारी सकाळी अंत्यविधी होत असताना माझ्या मुलीला कोठे घेऊन जात आहात, अशी विचारणा त्या करीत होत्या. मुग्धाची लहान बहीण अक्षतासुद्धा दीदीला काय झाले, म्हणत रडत होती. उपस्थितांनादेखील अश्रू आवरता आले नाही.