लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्र यासह क्षय रुग्णालयात बसविण्यात आलेली सोलर प्रणाली गत पाच महिन्यांपासून बंद आहे.
देखभाल-दुरुस्तीचा अभाव असून, सोलर पॅनेल हे केवळ शोभेची वास्तू ठरत असून, यातील बॅटऱ्या देखील चोरीला गेल्या आहेत. यासंदर्भात अकोला येथील आरोग्य उपसंचालकांनी 'मेडा'च्या अधिकाऱ्यांना कळविले आहे. मात्र, गोवा येथील सेवा पुरवठादार कंपनी गायब झाल्याची माहिती आहे. मेळघाटातील चुरणी येथील ग्रामीण रुग्णालय यासह काटकुंभ, हतरू, रामतीर्थ, चंद्रपूर, कापुसतळणी आणि कोकर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, दर्यापूरचे एसडीएच, अमरावती येथील क्षय रुग्णालयात सोलर प्रणाली आर्थिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये बसविण्यात आली आहे. सेवा पुरवठा कंत्राटानुसार २०२५-२०२६ पर्यंत सोलर प्रणालीची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी गोवा येथील मे. अग्रवाल रिन्वयुवेबल एनर्जीकडे आहे. तथापि, 'मेडा' मार्फत आरोग्य यंत्रणेकडे स्थापित करण्यात आलेली सोलर प्रणाली सातत्याने नादुरुस्त असल्याबाबतचे पत्र अकोला येथील आरोग्य उपसंचालक डॉ.
राजकुमार चव्हाण यांनी ५ जानेवारी २०२२ रोजी 'मेडा' अमरावती विभागाचे जनरल मॅनेजर यांना पाठविले होते. असे असताना गत पाच वर्षांत एकदाही गोवा येथील पुरवठादार एजन्सीने सोलर प्रणालीची देखभाल-दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे सौर ऊर्जा प्रणालीचा मेळघाटात पुरता बोजवारा उडाला आहे. लाखो रुपयांचे सोलर पॅनेल आणि यंत्र धुळखात पडले असून, हा एक प्रकारे शासन तिजोरीवर डल्ला मारल्याचा प्रकार मानला जात आहे.
राज्याच्या आरोग्य संचालकांकडे तक्रारमेळघाटसह अन्य ठिकाणी आरोग्य कार्यालयाच्या इमारतीवर उभारण्यात आलेली सोलर प्रणाली कुचकामी ठरल्याबाबत राज्याच्या आरोग्य संचालकांकडे तक्रार करण्यात आली आहे.
'त्या' गोव्याच्या एजन्सीला काळ्या यादीत टाकाकरारानुसार सौर ऊर्जा प्रणालीची देखभाल-दुरुस्ती न करणाऱ्या गोवा येथील मे. अग्रवाल रिन्वयुवेबल एनर्जी या एजन्सीला काळ्या यादीत टाका, असे पत्र अकोला येथील उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी यांनी १९ ऑगस्ट २०२५ रोजी आरोग्य सेवा आयुक्तांना पाठविले आहे. 'मेडा'ला गोवा येथील पुरवठदार एजन्सीबाबत वारंवार पत्राद्वारे कळविले आहे. मात्र, 'मेडा'ने कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले नाही, असे पत्रात म्हटले आहे.
"गोवा येथील मे. अग्रवाल रिन्वयुवेबल एनर्जी या एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याबाबत पुणेस्थित 'महाऊर्जा' ला कळविले आहे. 'आरोग्य'ला सोलर प्रणाली स्थापित करण्यासाठीच्या निविदा मुख्यालयातून झाल्या आहेत. मेळघाटात सौर ऊर्जेवर जास्त क्षमतेच्या मशीनचा वापर केल्याने सोलर प्रणाली नादुरुस्त झाली आहे."- प्रफुल्ल तायडे, 'मेडा' महाव्यवस्थापक