वरूड : शहरातील जीवनावश्यक वस्तूंचे विक्रेते सोडून इतर व्यावसायिकसुद्धा बंद दुकानातूनही शटरआड व्यवसाय करीत आहेत. परंतु, लहान दुकानदार मात्र दुकाने कुलूपबंद ठेवून घरातच आहेत. या मोठ्या दुकानदारांना कोण आवरणार, हा प्रश्न आहे. अशा दुकानदारांविरुद्ध स्थानिक पालिकेने एकही कारवाई केलेली नाही.
राज्यात १५ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू असून, अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आणि विक्रीस बंदी करणारे आदेश आहेत. जीवनाश्यक वस्तू वगळता, इतर वस्तूची विक्री करताना दिसल्यास दंड आणि दुकाने सील करण्याची कारवाई केली जाते. परंतु, शहरात कापड, इलेक्ट्रिक आदी दुकानांतून सर्रास आतून विक्री करून लाखो रुपयांचा व्यवसाय केला जात आहे. लहान दुकानदारांकडे भाडे आणि वीज भरण्याची सोय नसून, ते हलाखीचे जीवन जगत आहेत. मोठ्या दुकानदारांची चांगली कमाई सुरू आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून, नावापुरता आणि गोरगरिबांकरिताच लॉकडाऊन आहे का, अशी विचारणा सर्वसामान्य करू लागले आहेत.