धक्कादायक ! आमदारांच्या झिल्पी गावात अल्पवयीन मुलीचा विवाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 18:00 IST2022-12-23T17:52:53+5:302022-12-23T18:00:20+5:30
सहा महिन्यांची गर्भवती, सासूने केली अंगणवाडी केंद्रात नोंद

धक्कादायक ! आमदारांच्या झिल्पी गावात अल्पवयीन मुलीचा विवाह
नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) : देशात बालविवाह कायदा असला तरी मेळघाटातील धारणी तालुक्यातील झिल्पी गावात अल्पवयीन मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याची नोंद अंगणवाडी केंद्रात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. गावपंचायतीच्या निर्णयानंतर घरात घेण्यासाठी हा बालविवाह करण्यात आल्याची येथे चर्चा आहे. विशेष म्हणजे, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचे हे मूळ गाव आहे.
मेळघाटात पूर्वी मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असत. त्याला आळा घालण्यासाठी विविध संस्था, शासकीय विभाग, गावपातळीवर ग्रामपंचायत, सरपंच, पोलिस पाटील आदी यंत्रणा कार्यरत आहेत. महिला व बालकल्याण विभागामार्फत मेळघाटात चाईल्ड लाईन या संस्थेमार्फत बालविवाह रोखण्याचे कार्य केले जाते. असे असले तरी या भागातील झिल्पी गावातच हा विवाह झाल्याने या यंत्रणांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
गावातीलच युवकाशी प्रेमसूत जुळल्यानंतर ५ जानेवारी २००५ ही जन्मतारीख असलेली अल्पवयीन मुलगी १७ वर्षे ५ महिन्यांची असताना गर्भवती झाली. गावातील अंगणवाडी केंद्रात ४ नोव्हेंबर रोजी तिच्या सासूने ती गर्भवती असल्याची नोंद केल्याची माहिती अंगणवाडी सेविका सुकराई मावसकर यांनी ‘लोकमत’ला दिली. आरोग्य विभागातर्फे तिचे लसीकरण करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात ती १८ महिन्यांची होईल, त्यानंतर तीनच महिन्यांनी प्रसूती होणार आहे. या प्रकरणात चूक कोणाची, प्रकरण दडपण्याचा कोणी प्रयत्न केला, गावपंचायत बोलावली का, या सर्व बाबींची चौकशी कोण करणार, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
गावपंचायत; पोलिस पाटील म्हणतात - ना !
गावातील कुठल्याही पेचप्रसंगासाठी मेळघाटात गावपंचायत बोलावली जाते. या प्रकरणात गावपंचायत बसविण्यात आल्याची व त्यानंतर विवाह लावून दिल्याची गावात चर्चा आहे; परंतु पोलिस पाटील ज्योती कासदेकर यांनी त्याचा इन्कार केला. चाइल्ड लाइनला माहिती दिली होती, त्यांनी दखल घेतली नसल्याचा आरोपही कासदेकर यांनी केला आहे.
गावातील १७ वर्षे ११ महिने वयाची मुलगी गर्भवती असल्याची नोंद ४ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. ती सहा महिन्यांची गर्भवती आहे. सासूने तिला आणले होते. आरोग्य विभागाने लसीकरण केले.
- सुकराई मावसकर, अंगणवाडी सेविका, झिल्पी
गावातीलच अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याची माहिती चाइल्ड लाइनला दिली होती; परंतु त्यांनी दखल घेतली नाही. गावपंचायतीबाबत माहिती पोलिस पाटील असल्याने सर्वप्रथम आपणास असते.
- ज्योती कासदेकर, पोलिस पाटील, झिल्पी