कॉलेजकन्येला फुस लावून लैंगिक शोषण; पाच महिन्यांची गर्भवती
By प्रदीप भाकरे | Updated: August 28, 2023 14:51 IST2023-08-28T14:50:36+5:302023-08-28T14:51:00+5:30
नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

कॉलेजकन्येला फुस लावून लैंगिक शोषण; पाच महिन्यांची गर्भवती
अमरावती : एका १६ वर्षीय कॉलेजकन्येला फुस लावून तिचे लैंंगिक शोषण करण्यात आले. त्यातून तिला पाच महिन्यांची गर्भधारणा झाल्याची धक्कादायक घटना नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी उघड झाली. १ जानेवारी २०२३ ते २७ ऑगस्टदरम्यान तो प्रकार घडला. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११.५४ च्या सुमारास आरोपी नितीन नरसिंगकार (३२, नांदगाव पेठ) याच्याविरूद्ध बलात्कार व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, एका कनिष्ट महाविद्यालयात अकरावीची विद्यार्थीनी असलेल्या त्या १६ वर्षीय मुलीचे आरोपी नितीनशी गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. दोघांमध्ये टेलिफोनिक व सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद देखील होता. दरम्यान यंदाच्या जानेवारी महिन्यात आरोपी नितीन नरसिंगकार याने तिला त्याच्या मोपेड वाहनाने एका शेतात नेले. तेथे त्याने तिच्याशी जबरदस्ती शारिरीक संबंध केले. नंतर तिला घरी आणून सोडले. त्यानंतर नितीन नरसिंगकार याने तिला धमक्या देऊन चार ते पाच वेळा शेतात नेऊन तिच्याशी जबरदस्ती शारिरीक संबंध केले. त्या बाबीची वाच्यता केल्यास तुझ्या आई वडिलांना मारुन टाकेन, अशी धमकी त्याने दिली. म्हणून ती बाब आपण कुणालाही सांगितली नसल्याचे बयान पिडिताने दिले आहे.
बयानात झाला उलगडा
दरम्यान, पिडिताच्या आईने २६ ऑगस्ट रोजी पिडिताला वैद्यकीय तपासणीसाठी येथील एका खासगी रूग्णालयात आणले. तपासणीदरम्यान ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यामुळे पिडितासह तिचे कुटूंब हादरले. त्याबाबत बाल कल्याण मंडळासह नांदगाव पेठ व गाडगेनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीसांनी दिलेल्या बयानात आरोपीचे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.