मावशीच्या घरी गुप्तधन! पायाळू बालकाच्या मदतीने चार तांत्रिकांनी अघोरी पुजा मांडली अन्..

By प्रदीप भाकरे | Published: October 12, 2023 06:02 PM2023-10-12T18:02:41+5:302023-10-12T18:06:46+5:30

टाकळी जहागीर येथे घडला प्रकार, सहा जणांच्या टोळीला बेड्या, पोलिसांच्या सजगतेने टळला नरबळी!.

Secret money at aunt's house! tantrik performed Aghori Puja with the help of 12 year old boy born as 'breech baby' | मावशीच्या घरी गुप्तधन! पायाळू बालकाच्या मदतीने चार तांत्रिकांनी अघोरी पुजा मांडली अन्..

मावशीच्या घरी गुप्तधन! पायाळू बालकाच्या मदतीने चार तांत्रिकांनी अघोरी पुजा मांडली अन्..

अमरावती : अचलपूर तालुक्यातील १२ वर्षीय पायाळू बालकाच्या मदतीने एका महिलेच्या घरात गुप्तधन शोधण्यासाठी पुजा मांडण्यात आली. मात्र काही गावकऱ्यांना त्याची चाहुल लागल्याने पोलिसांनी तत्परतेने अंधश्रध्देचा तो डाव हाणून पाडला. याप्रकरणी, ज्या महिलेच्या घरात ती अघोरी पुजा मांडण्यात आली, त्या महिलेसह अन्य पाच जणांना अटक करण्यात आली. अमरावती तालुक्यातील टाकळी जहांगिर येथे ११ ऑक्टोबर रोजी रात्री १२.४५ च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला होता.            

पोलिसांनी त्या १२ वर्षीय मुलाची सुखरूप सुटका करून त्याला त्याच्या आईवडिलांच्या स्वाधिन केले. पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी याबाबत गुरूवारी दुपारी पत्रपरिषदेत संपुर्ण माहिती दिली. याप्रकरणी, नांदगाव पेठ पोलिसांनी रमेश गायगोले (६३, रा. टाकळी जहांगिर) यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र जादूटोणा कायदा २०१३ मधील कलम ३ व बालन्याय अधिनियम कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल केला. मुक्ताबाई (६३, रा. टाकळी जहांगिर), सुखदेव पाटोरकर (४०, भांडूम, चिखलदरा), रामकिशोर अखंडे (२३, बुरहानपुर), संजय हरिदास बारगंडे (३५), सचिन बाबाराव बोबडे (५०, दोघेही रा. कुंभी गौरखेडा) व रवि शालिकराम डिकार (२७) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील सचिन बोबडे हा मुक्ताच्या बहिणीचा मुलगा आहे. मावशीच्या घरी गुप्तधन आहे, असे सांगून त्यानेच मित्र असलेल्या चौघांना मुक्ता हिच्या घरी गुप्तधन शोधण्यासाठी बोलावले होते. विशेष म्हणजे, घटनेतील सर्व आरोपी फरार झाल्यानंतर रात्री दीड ते सकाळी दहा वाजेपर्यंत सहाही आरोपींना पकडण्यात नांदगाव पेठ पोलिसांना यश आले.

पोलिसांनुसार, टाकळी जहागीर येथील मुक्ता यांच्या घरात गुप्तधन असल्याची माहिती सचिन बोबडे याने सुखदेव व अन्य आरोपींनी दिली. त्यानुसार बुधवारी मध्यरात्रीनंतर ते गुप्तधन काढण्यासाठी सुखदेव पटोरकर महाराज, १२ वर्षीय पायाळू बालक आणि चार तांत्रिक या महिलेच्या घरी आले. घरात पूजा मांडून त्या बालकाची देखील पूजा करण्यात आली आणि घरात धन कुठे आहे, यासाठी त्याला चालायला लावले. या अघोरी प्रकारची चुणूक गावातील काहींना लागताच त्यांनी रात्री १२.४५ ला सुमाारास डायल ११२ ला माहिती दिली. पोलिस येण्यापुर्वीच आरोपींनी तेथून पळ काढला.

हळद, कुंकू, राख आढळली

ठाणेदार प्रवीण काळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांना घरात मांडलेली पूजा व त्यात हळद कुंकू, राख, सब्बल व चटई दिसून आली. तेथून मुक्ताबाईला व एका घराच्या बाथरूममधून सुखदेव पाटोरकर याला ताब्यात घेतले. तेथून पुढे गौरखेडा कुंभी, मल्हारा व तिवसा तालुक्यातील सातरगाव येथून अन्य चार आरोपींना अटक करण्यात आली. एएसआय राजू काळे, अंमलदार संजय खारोडे, प्रवीण नवलकर, पंकज यादव, संजय इंगोले यांनी ही कारवाई केली.

तो मुलगा मल्हारा येथील

गुप्तधन शोधण्यासाठी आरोपींनी मल्हारा येथून एका १२ वर्षीय पायाळू मुलाला टाकळी येथे आणले. त्यासाठी त्याच्या वडिलांकडे खोटी बतावणी केली. मात्र, आरोपींना त्याच्या वडिलांना काही रक्कम दिली असावी, असा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी त्या मुलाच्या वडिलांना देखील चौकशीसाठी बोलावले आहे.

Web Title: Secret money at aunt's house! tantrik performed Aghori Puja with the help of 12 year old boy born as 'breech baby'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.